Wednesday, January 11, 2012


आजही काम संपवून उघडायला तिला personal mail box उघडायला उशिरच झाला होता. दमलेल्या आणि कंटाळलेल्या नजरेने तिने  urgent mails शोधायला सुरुवात केली. निमंत्रण पत्रिकेची samples designer agency  ने पाठवली होती. आधी पाठवलेले नमुने reject  करताना तिने ज्या सूचना केल्या होत्या त्यानुसारच खरं तर आत्ताचे नमुने पाठवले होते. पण तरीही ते तिच्या पसंतीस उतरेनात. हळूहळू विचार करताना तिला उमगत गेलं की निमंत्रण पत्रिकेची designs नव्हे तर निमंत्रण पाठवून लोकांना गोळा करायची कल्पनाच मुळात तिला पसंत नव्ह्ती. पण काय करणार? तशी रीतच होती अलिकडे. शेवटी यावर फार  वेळ घालवायचा नाही असं ठरवून तिनं त्यातलच एक design निवडलं. Designer ने पाठवलेला काव्यात्म मजकूर मात्र तिनं संपूर्ण बदलून स्वतःच draft केला.

'दि. ३ मार्च ३०१३ रोजी माझा मृत्युदिन आहे. वेळ दु. ३.१३ मिनिटांची आहे. मृत्युपत्राचे वाचन
दुपारी ठीक २.०० वाजता होईल. तरी निरोप समारंभासाठी सर्वांनी उपस्थित राहावे ही आग्रहाची विनंती.'  आजकाल नेटवर मृत्यू निमंत्रण पत्रिकेचे काव्यात्म मजकुरांचे अनेक नमुने उपलब्ध होते. पण तिला मात्र हा मजकूर तिच्या व्यक्तिमत्वाला शोभेसा वाटला - जे म्हणायचं ते कुठल्याही आवरणांमध्ये न गुंडाळता थेट आणि स्पष्ट.

मृत्युलेखांचेही drafts उपलब्ध होते. शिवाय १-२ लेखक फारच प्रसिद्ध झाले होते अगदी perfect आणि touching मृत्युलेख लिहिण्यासाठी. आपण फक्त ज्या व्यक्तीवर लेख लिहून हवा आहे तिचा data पुरवायचा. मृत्युदिनाच्या दिवशी अगदी चढा ओढच लागलेली असते सर्वात उत्तम श्रद्धांजली सादर करण्याची. Video form मध्ये श्रद्धांजली वाहणारेही बरेच जण असतात. अचानक तिच्या लक्षात आलं की planning करताना या श्रद्धांजली कार्यक्रमासाठी तिने वेळच ठेवलेली नाही. पण नकोच ते. खरं तर इतकं artificial होतं ना कधी कधी. तिनं निमंत्रण पत्रिकेच्या मजकुरात एक ओळ add  केली. आपली उपस्थिती हीच श्रद्धांजली. कृपया लेख, videos इ. आणू नयेत.'

तिला एकदम 'त्या'ची खूप खूप आठवण आली. त्याला जाऊनही आता जवळजवळ ७ वर्ष लोटली. त्यांच्या लग्नाला तिच्या घरच्यांनी विरोध केला होता, कारण त्याची आयुर्मर्यादा तिच्यापेक्षा कमी होती. अलीकडे लग्नं  करताना इतर गोष्टींबरोबर आयुर्मर्यादा जुळते की नाही हेही पाहिलं जात होतं. पण तिनं ठामपणे सांगितलं होतं की आमचा वेगवेगळा असला तरी आमचं एकमेकांवर प्रेम आहे. जे काही आयुष्य एकत्र जगू ते छान सुखात जगू याची आम्हाला खात्री आहे.'

सगळं समजून-उमजून स्वीकारलं असलं तरी प्रत्यक्षात जेंव्हा त्याच्या जाण्याचा काळ जवळ येऊ लागला तेंव्हा ती सैरभैर झाली. त्यानंच शेवटी निरवी-निरवीची कामं बाजूला ठेवून हे सगळं तिनं सहजभावान स्वीकारावं यासाठी तिला मदत केली होती. आता.......१३ मार्च नंतर ती कुठ जाईल? तिथ त्याची भेट होईल का? आयुर्मर्यादा जाणून घेणं माणसाला अवगत झालं असलं तरी मृत्युनंतर काय होतं हा प्रश्न अनुत्तरीतच होता.


तिनं हातात असलेल्या कालावधीत करायच्या कामांचा आढावा घ्यायला सुरुवात केली. बर्‍याचशा गोष्टी automatically होणार होत्या. बॅंकेची खाती, घराची आणि इतर assetची मालकी १३ मार्च रोजी दुपारी ३.१४ वाजता वारसदारांच्या transfer नावे होणार होती. वाहन परवाना, पासपोर्ट रद्द होणार होते. फक्त मतदार यादीच्या यंत्रणेत नेहमीच बिघाड असायचा त्यामुळे तेथून नाव वजा होईलच याची खात्री करण्यासाठी आधी intimate करणं गरजेचं होतं. मॄत्यूपत्रं तिचं तसं तयारचं होतं. फ़क्त final touch द्यायचा होता.

तिला समाधान वाटलं. शेवटच्या दिवसात तिची धावपळ होणार नव्हती. तसंही ती नियोजनबद्ध आयुष्यच जगली होती. पण स्पृशाइतकही नियोजनबद्ध नाही. तिचं इतकं काटेकोर नियोजन buffer timeसह असे की अखेर प्रत्यक्ष त्या तारखेच्या आधी ८ दिवस करायच्या सर्व गोष्टी करून संपल्या. ते ८ दिवस निव्वळ वाट पाहत काढणं फार जड गेलं तिला. याऊलट विभोर-. त्याला कुठलीच dead-line पाळता आली नाही कधी. महत्त्वाची आणि तातडीची कामं सोडून विभोर कायमच बिनमहत्त्वाच्या पण तातडीच्या किंवा कधीकधी बिनतातडीच्याही कामात अडकलेला असायचा. जेव्हा खरोखरीची 'dead-line' आली तेव्हाही त्याची अगदी करायलाच हवीत अशी कामंही राहिली होती. त्याच्या जवळच्या माणसांची उलघाल व्हायला लागली पण सांगणार तरी कसं सारखं? शेवटी विभोर जबाबदार्‍या अर्धवट टाकूनच 'dead-line' पार करून गेला. त्याची अखेरही वाईटच झाली. सगळे नियोजित दिवशी नियोजित वेळेला त्याच्या घरी जमलेले आणि तो मात्र राहिलेली legal matters complete करण्याच्या धावपळीत. शेवटी रस्त्यातच accident  झाला त्याचा.


आताशा accident चं प्रमाण कमीच झालं होतं. मृत्यूची तारीख-वेळ माहित असताना कोण कशाला त्यावेळेला मरायला रस्त्यावर जाईल. आपल्या माणसांसोबतच असणं prefer करतात सगळे. अपघात फक्त रोजची हातावर पोट असलेल्यांचे, एकाकी-तुटलं आयुष्य जगणार्‍यांचे आणि विविध कारणांनी वेळेचं नियोजन चुकलेल्यांचे होत असतात.


तिला एकदम dictionery त  वाचलेला आत्महत्या हा शब्द आठवला. ही संकल्पनाच खरं तर कालबाह्य झालीय. काही लोकं करतात प्रयत्न - ते फारच illogical असतात किंवा आगतिक असतात. जाण्याची तारीख-वेळ माहित असताना आधी प्रयत्न करण्यात काय अर्थ आहे? आणि ठरल्यावेळी तर तुम्ही प्रयत्न न करताही जाणारच आहात मग उगाच कशाला आटापिटा?  शेवटी मृत्यूदिनांक, वेळ कळलं तरी मनुष्यस्वभाव बदलत नाही हेच खरं.

ती हसली. तिला मनस्विन आठवला. तिच्याच प्रोजेक्टवर काम करतोय. पण ती प्रोजेक्टच्या यशस्वितेचं ओझं डोक्यावर कायम बाळगणारी, त्यासाठी आटापिटा करणारी तर तो अगदी निवांत. म्हणजे काम करतो मनापासून पण कुठली ओझी डोक्यावर बाळगत नाही. त्याला आयुष्य येईल तसं सहज स्विकारताना पाहून तिला आयुष्याकडून असलेल्या आपल्या अपेक्षांचं नवलच वाटायला लागलं होतं. जणू १३ मार्च ही आयुष्याचा प्रोजेक्ट संपण्याची तारीख होती - त्याच्या आत set objectives पूर्ण करायचे होते. त्यामागे धावताना तिनं काय काय गमावलं होतं...मनस्विनचं चौफेर, रशरशीत आयुष्य बघताना तिला जाणवायचं की आपल्यालाही अनेक  विषयांत, कलांमध्ये गती आहे, पण ते सगळं आठवणी काढण्यापुरतच उरलंय. मनस्विनसारख जगावं असं तिला फार वाटायचं पण जमलं तरी नव्हतं आजपर्यंत.


तिचं प्रोजेक्ट मार्च १२ मध्ये संपणार होतं. कंपनी प्रोजेक्ट प्लॅन करतानाच त्यातल्या महत्त्वाच्या   stake-holders च्या आयुर्मर्यादा लक्षात घ्यायची. Package देतानाही त्याचा विचार होतो. जे शेवटपर्यंत  productive, त्यांना जास्त incentives तर ज्यांच्या बाबत कंपनीच्या liabilities जास्त त्यांना कमी incentives. प्रोजेक्ट तिच्या मृत्यूदिनाच्या १ वर्षं आधी संपेल याची काळजी घेतली होती. मनस्विन म्हणाला होता, ’हे वर्ष तू अगदी मुक्त जगून पहा, काहीही plan न ठरवता.’ पण छे, प्रोजेक्ट ६ महिने लांबणार होतं. ’तू मार्चमध्ये बाहेर पड. तुझ्या आयुष्यातले हे ६ महिने तुझ्यासाठी प्रोजेक्टहूनही महत्त्वाचे आहेत.’ हा मनस्विनचा विचार आकर्षक वाटत असला तरी स्विकारता येत नव्हता. ’जाताना मला घेतली जबाबदारी शेवटपर्यंत नीट पार पाडल्याचं समाधान असेल.’ या तिच्या वाक्यावर तो फक्त हताशपणे हसायचा.

आता शेवटी प्रोजेक्ट संपल्यानंतरचे ६ महिनेच तिच्या हाती उरले होते. पण नाही-नाही म्हणत तेही तिने तिच्या स्वभावाप्रमाणे plan केलेच होते. तिच्या शहरापासून साधारण १८०० कि. मी. अंतरावर ’नर्मदा’ नावाची नदी होती. पूर्वी म्हणे लोक त्या नदीच्या काठानं चालून संपूर्ण गोल फेरी मारत, त्याला ’नर्मदा परिक्रमा’ असं म्हणत. तिच्या family hostory मध्ये तिच्या पूर्वजांपैकी एकीनं अशी नर्मदा परिक्रमा केली होती. तिच्या प्रवासाचं तिनं केलेलं documentation, net surfing करताना अचानकच तिच्या हाती लागलं होतं. त्या काळात या अध्यात्मिक वर्णन करण्याची प्रथा असताना तिनं मात्र तिथलं सामाजिक , पर्यावरणीय जीवन आणि त्यावर होत असलेल्या तथाकथित विकास कल्पनांच्या विविध आक्रमणांबद्दल लिहिलं होतं. त्यानंतर पुढची अनेक शतकं ती आक्रमणं होतच राहिली पण मग जगण्याच्या लढाईत अर्थिक-सामाजिक-राजकीयदृष्ट्या दुर्बल असलेली लोकं संपवली गेली, शिवाय अन्य ग्रहांवर वस्ती करण्याचे पर्याय उपलब्ध झाले त्यामुळे लोकसंख्या कमी झाली. त्यामुळे अशा तितक्याशा सोयीच्या नसलेल्या जागा गेल्या १०-१२ शतकात दुर्लक्षिल्या गेल्यात. आता म्हणे पुन्हा तिथं दाट जंगल वाढलय. २१व्या शतकात झालेल्या नोंदीच्या पार्श्वभूमीवर आता तो परिसर पाहण्यात तिला रस होता. म्हणून इतर सर्व पर्याय सोडून तिनं ’नर्मदा परिक्रमा’ करण्याचा निर्णय जाहीर केला तेव्हा इतरांना हा  ऐकून भोवळच आली होती. पण काही झालं तरी ती २ महिने आधी परत येणार होती आणि शेवटचे काही दिवस हे जवळच्या माणसांसोबत राहण्यासाठी तिनं राखून ठेवले होते. त्यामुळे सगळ्यांनी कसाबसा का होईना तिचा हा निर्णय स्विकारला. 
---------------------------------------------------------------------------------------

तिची नर्मदा परिक्रमा संपली तेव्हा ती जणू पूर्ण बदलूनच गेली होती. एक संपूर्ण वेगळं विश्व तिच्यापुढे उलगडलं गेलं होतं. किती वेगळा परिसर, किती वेगळा समाज आणि किती वेगळा निसर्ग तिनं या ३ महिन्यात पाहिला होता. सगळं किती अकृत्रिम, स्वाभाविक. हे सगळं याच कालखंडात अस्तित्त्वात आहे यावर तिचा विश्वासच बसेना. सगळ्यात धक्कादायक गोष्ट होती ती म्हणजे इथल्या लोकांसाठी ’मृत्यू’ ही घटना अचानक, अनपेक्षितपणे घडणारी घटना होती. हे कळलं तेव्हा तिला ते फार भयंकर, कल्पनेच्या पलिकडलं वाटलं. आपण केव्हा मरणार हे माहित नाही....? मग जगायचं कसं? कशा ठरवायच्या सगळ्या गोष्टी? छे. छे, ध्यानी-मनी नसताना एक दिवस कधीही अचानकच सगळं अर्धवट सोडून मरायचं हे किती धक्कादायक आणि संकटं निर्माण करणारं? इतरांसाठी तर नक्कीच - स्वतःसाठी.....माहित नाही. तिला त्याची कल्पनाही करता येईना.

पण मग हळू-हळू तिला ती कल्पना आवडायला लागली. तिला जाणवलं की आपल्या जगातलं सगळं जगणंच मृत्यूभोवती गुंफलं गेलय. आयुष्यातली कोणतीही गोष्टं ठरवताना, निर्णय घेताना - करिअर, लग्न, मुला-बाळांचे निर्णय - सगळ्याचा reference point मृत्यूदिन हाच असतो. ही इथली लोकं मात्र मृत्यूचा विचारच करत नाहीत. जगताना निव्वळ जगतात. शिवाय आपल्याकडे जगण्याचा किती कालावधी आहे हे माहित असल्याने आपलं सगळं आयुष्य केवळ time planning झालय. किती गेले आणि आणि किती राहिले याचा हिशेब सततचा. एखादा जरी दिवस काही न करता घालवला तरी जगण्याच्या एवढ्या काळातला एवढा-एवढा वेळ गेला असे हिशेब आपण करतो. स्वच्छंद जगणारा मनस्विन विरळाच. 

आज तिचा परिक्रमेचा शेवटचा दिवस होता. खरं तर आजची नेमकी तारखही तिला आठवत नव्हती. एक विचित्र उलघाल गेले काही दिवस होत होती. नर्मदेच्या विशाल पात्राकडे पाहत ती कितीतरी वेळ नुसतीच बसली होती. त्या पाण्यासारखच हळूहळू तिचं मन संथ, शांत होत गेलं. ती उठली तेव्हा तिचा निर्णय झाला होता. परिक्रमेत वाटॆवर आलेल्या आणि फार आवडलेल्या गावाच्या दिशेने तिची पावलं पडू लागली. तिचा मृत्यू आता घटका-पळे मोजत साजरा करण्य़ाची गोष्ट राहणार नव्हती. तिच्या भोवतीच्या माणसांसाठी आणि काही प्रमाणात तिच्यासाठीही ती आता एक नैसर्गिक पण अचानक घटना असणार होती. तिची पावलं परत फिरली - निव्वळ जगण्याच्या दिशेने....

2 comments:

  1. मृत्यूची वेळ माहीत असणे, कल्पना वेगळीच. खरंच अशी तारीख माहित झाली तर जगणं कसं असेल? नियोजनपूर्वक असेलच पण गुणात्मक दृष्ट्या सकारात्मक की नकारात्मक? सकारात्मकही असू शकेल कारण तसंही मृत्यूची अटळता आपण स्वीकारली आहेच, तारीख कळणे ही त्याची पुढची पायरी एवढंच. माणसे हे ही स्वीकारतील. पण तरीही मृत्यू हाच reference point धरून त्यानुसार जगणं मात्र भयाणच!

    ReplyDelete
  2. it is witty and it is definitely meaningful.
    either way... life with life and life with death as the 'point'.
    thanks for sharing such a wonderful idea...

    ReplyDelete