Sunday, May 14, 2017

असूनी खास...म्हणविती मागास


पडसऱ्याच्या आश्रमशाळेतला हिरामण शाळेतून घरी निघून गेला होता. त्याला परत आणायला मी, माझ्याबरोबर काम करणारी माझी मैत्रीण सीमा, शाळेतले जाधवर सर आणि सोबतीला चेरफळच्या ठाकरवाडीचा एक विद्यार्थी ज्ञानेश्वर असे चौघजण चेरफळ वाडीला गेलो. वाडीत हिरामणची समजूत काढून, वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या घरी भेटी देऊन निघेपर्यंत उशीर झाला. मग जेवायचा आग्रह झाला. जेवून निघालो तेव्हा बराच अंधार झाला होता. खरीपाचा हंगाम संपून गेलेला असल्यामुळे शेतं रिकामीच होती. अंधारात वाट शोधताना ज्ञानेश्वरचा आम्हाला आधार वाटत होता. सारीजण खाली शेतातून, तर मी एकटीच बांधावरून चालले होते. अचानक ज्ञानेश्वरने मला खाली खेचले. बेसावध असल्याने मी जवळपास कोलमडलेच. त्याच्या या अचानक कृतीने सारेच चकित झाले. पण त्या आश्चर्यातून सावरायच्या आधीच माझ्या पायापुढून एक साप सळसळत जाताना दिसला. रात्रीच्या अंधारात आम्हा कोणाच्याच डोळ्यांना न दिसलेला तो विषारी साप ज्ञानेश्वरच्या डोळ्यांना बरोबर दिसला होता. जंगलात सुरक्षितपणे वावरण्यासाठी जी तयार नजर लागते ती नजर ज्ञानेश्वरकडे होती म्हणून मी वाचले

आदिवासी मुलांकडे असलेल्या अशा अफलातून क्षमतांचा प्रत्यय असा वेळोवेळी येत गेला. विशेषतः जंगल हा त्यांना अवगत असलेला विषय. पडसऱ्याला असताना एकदा मी मुलांबरोबर झाडांची यादी करण्याचा खेळ खेळत होते. साधारणतः १५ ते २० मिनीटांमध्ये त्यांनी १०० च्या वर झाडांची यादी तयार केली. प्रत्येक झाडाचे वर्णन, त्याचे उपयोग याबद्दलच्या माहितीचा साठा त्यांच्याकडे होता. नंतर पुढे शाळेची सहल जवळच्या धरणावर गेली तेंव्हा जंगलाच्या वाटेवर यातली कित्येक झाडं-वेली मुलांनी आम्हाला दाखवल्या.


हाच अनुभव मला पुढे बायफबरोबर काम करताना आला. ठाणे-रायगडपासून गडचिरोली-गोंदियापर्यंतच्या मुलांनी अनेकानेक झाडांची माहिती आणि त्याच्या बिया आमच्या संग्रह प्रकल्पांतर्गत गोळा केल्या होत्या. नंदूरबारमधील कित्येक शाळांमध्ये तर कितीतरी दुर्मिळ झाडांची बियाणी गोळा झालेली मला आठवत आहेत

रायगडमधल्या जांभूळपाड्यात काम करत असताना एकदा दांड कातकर वाडीच्या मुलांबरोबर टूम निघाली ती शेवळाची भाजी खायला जंगलात जाण्याची. शेवळाची भाजी पावसाळ्याच्या सुरूवातीला ठराविक काळच जंगलात उगवते. जंगलच्या वाटेने चालताना मुलांची अखंड टकळी चालू होती. आजूबाजूच्या परिसराबद्दल कितीतरी गोष्टी ती सांगत होती. पुस्तक न वाचता येणारी ही मुले जंगल मात्र अचूक वाचत होती. मुलांना जंगलात शेवळं नेमकी मिळतात कुठे हे ठाऊक होतं. लांब दांडक्यासारखी शेवळं मुलांनी उपटून घेतली. आम्ही जंगलातच स्वयंपाक करून जेवणार होतो. रानातली पाण्याची जागाही त्यांना माहित होती. भाकरी, तिखट, मीठ, एक पातेलं असं साहित्य मुलांनी बरोबरच आणलं होतं. जंगलातच मुलांनी दगडाच्या चुलीवर भाजी रांधली आणि आम्ही मजेत जेवलो.  या अवधीत तिथल्या जंगलातल्या वनस्पती, पशू-पक्षी, किटक यांच्याबद्दल आम्हाला कितीतरी माहिती मिळाली होती

नंदूरबारमध्ये काम करत असताना एकदा आम्ही एक शिबिर आयोजित केले होते. मुलांची भीड मोडण्यासाठी आणि गंमत आणण्यासाठी शिबिरात काही खेळकोडी ठेवली होती. या खेळकोड्यांचे वैशिष्ट्य असे होते की ती सोडविण्यासाठी चौकटीबाहेरचा विचार करणे आवश्यक होते. मी सुरूवातीला पुण्याच्या सहकाऱ्यांबरोबर आणि नंतर नंदूरबारमधील सहकाऱ्यांबरोबर हे खेळ वापरून पाहिले होते. त्यातून खेळकोडी सोडवायला किती वेळ लागतो आहे याचा अंदाज घेतला होता आणि त्याप्रमाणे शिबिरात त्यासाठी वेळ निश्चित केला होता. प्रत्यक्षात मात्र आमचे वेळापत्रक पारच कोलमडले कारण आम्ही गृहित धरल्यापेक्षा कितीतरी कमी वेळात मुलांनी ही खेळकोडी सोडवली होती. Out of the box विचार करण्याची त्यांची क्षमता जास्त होती की मुळातच त्यांची विचार करायची पद्धत वेगळी होती? पण त्यांच्यातली ही विशेष क्षमता नोंद घेण्याजोगी होती हे निश्चित. 

पुढे प्रत्यक्ष काम करतानाही आम्हाला त्यांच्या या क्षमतेचा प्रत्यय आला. ‘To eat the cake and have it too’ या इंग्रजीतील म्हणीचा वापर एखाद्या अवास्तव अपेक्षेचं वर्णन करण्यासाठी सहसा होतो. पण तळोदा तालुक्यातील अमोणी आश्रमशाळेत जेव्हा परसबागेत पिकवलेली भाजी बाहेर विकायची की शाळेच्या स्वयंपाकघरातच शिजवून खायची असा प्रश्न उभा राहिला तेव्हा परसबागेचा अध्यक्ष असलेल्या पंडित पावराने त्यावर असे काही उत्तर शोधले की मुलांना ती भाजी खायला तर मिळालीच पण त्याचवेळी त्याच भाजीची विक्री करून त्यांनी पैसेही मिळवले. 

उमजच्या आश्रमशाळेत पेरूच्या झाडांवर मोजकेच पेरू लागले. शाळेत मुला-मुलींची संख्या ३५०-४०० च्या आसपास. पेरूंच्या वाटपाचे गणित परसबाग समितीच्या मुलांनी असे सोडवले की त्यातून त्यांच्या संवेदनशीलतेचा प्रत्यय आला. त्यांनी स्वतः खाण्याऐवजी किंवा मित्र वा शिक्षकांना देण्याऐवजी, पहिली-दुसरीच्या लहान मुलांना हे पेरू वाटून द्यायचे ठरवले. 

कोकणापासून विदर्भापर्यंत सर्वत्र काही समान शारिरीक क्षमता आदिवासी मुलांमध्ये आढळून आल्या. बहुसंख्य आदिवासी मुले विविध मैदानी खेळांमधे प्रवीण असतात. झाडावर चढणे, खेकडे-मासे पकडणे, सहजगत्या डोंगर चढणे-उतरणे, पोहणे, डोंगी म्हणजे नावेचा एक प्रकार चालवणे अशा कितीतरी गोष्टी मुले आणि मुली लिलया करताना दिसतात. अनुताईंनी एका गाण्यात या मुलांचे वर्णन केले आहे –धीट बाई धिटुकली धिटुकली, भीत नाहीत पिटुकली पिटुकली’.

निसर्गाने जणू त्यांना गळ्यात सूर, पायात ताल आणि हातात कला देऊनच पाठवलेले असते. एक विशेषता म्हणजे गाणं असो की नृत्य, ते सामूहिकच असते. मुले सामूहिक चित्रही किती उत्तम रितीने काढू शकतात याचाही अनुभव घेतला. थोडक्यात टीम वर्कसाठीच्या उच्च कोटीच्या क्षमता या मुलांमधे असतात हेही वेळोवेळी अनुभवले. 


अशा विविधांगी क्षमता व बुद्धिमत्ता असलेली ही मुले शालेय अभ्यासक्रमात, शालेय परिक्षांमध्ये मागे का बरं पडतात हा प्रश्न मला पडायचा. 

आपल्या झाडांना पाणी देण्यासाठी कप्पीचा वापर करणाऱ्या मुलाला, गुरूत्वाकर्षणाच्या नियमाचा वापर करून पाणी वळवून वाफ्यांपर्यंत नेणाऱ्या मुलांना विज्ञानाच्या अभ्यासात रस का वाटत नसेल
जंगल जवळपास पाठ असणाऱ्या मुलांना परिसर अभ्यास का अवघड वाटत असेल? आणि त्यांच्यापैकी कोणीच पुढे जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र, पर्यावरणशास्त्र अशा ज्ञानशाखांमधे अधिराज्य गाजवण्याची क्षमता असणारी ही मुले तिथपर्यंत का पोहचत नाहीत?

धडगावमध्ये सीताफळ विक्री करताना किंवा सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात करवंदाची विक्री करताना चटकन् तोंडी हिशेब करणारी मुले गणितामध्ये का नापास होतात?

जंगलाचा नकाशा तोंडपाठ असणाऱ्या मुलांना भूगोलातले नकाशे का बरं भूल देत असतील?

स्वतः गाणी रचणारी, गोष्टी तोंडपाठ असणारी मुले विविध भाषा विषयांमध्ये का बरं मार खात असतील?

आदिवासी भागामधे असणाऱ्या शाळांमधील गुणवत्तेची निम्नतम पातळी  हे तर मोठे आणि महत्त्वाचे कारण आहेच पण  आदिवासी मुलांना अभ्यासात रस नाही अशीही नोंद विविध अभ्यासांमधून वाचली होती. पण रस का नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे. काही निवडक अभ्यासांमधे या मुद्द्याची चर्चा केलेली होती. या वाचनातून या प्रश्नाचे वेगवेगळे आयाम लक्षात येत गेले.
  
एकूण शिक्षण व्यवस्थाच आदिवासी मुलांसाठी परकी असणे हा महत्वाचा मुद्दा  दसरासारख्या संस्थेच्या अभ्यास अहवालांमध्ये नोंदवला गेला. आदिवासी भाषांपेक्षा परक्या असलेल्या राज्यभाषेतून शिक्षण, आदिवासी भावविश्वाशी परका असणारा अभ्यासक्रम आणि  आदिवासी मुलांना आपलीशी न वाटणारी अध्यापन पद्धती अशा गोष्टींचा उहापोह दसरा अभ्यासाने केला. या संदर्भात 'महिपाल भूरिया' यांच्यासारख्या आदिवासी समाजातूनच आलेल्या अभ्यासकाने नोंदवलेल्या मताला विशेष गंभीरपणे पाहिले पाहिजे. त्यांनी असे म्हटले आहे, आदिवासी समाजातील मुलांना ४ प्रकारच्या दूरीकरणाला / अलगतेला (alienation) सामोरे जावे लागते. 

   १)      बहुसंख्य शाळांच्या ठोकळेबाज उदासवाण्या व गावातील घरांशी आणि भौगोलिक परिसराशी मेळ न बसणाऱ्या इमारती आणि आजूबाजूचा ओसाड, उजाड परिसर मुलांना परका वाटतो.
   २)      शाळेचे वार्षिक सुट्ट्यांचे कॅलेंडर, दैनंदिन वेळापत्रक ठरवताना आदिवासी समाजाची संस्कृती - आदिवासी समाजाचे सण, समारंभ, शेतीचे कॅलेंडर, अजिबात लक्षात घेतले जात नाही.
   ३)      आदिवासी समाजाचे रितरीवाज, भाषा, संस्कृती या सगळ्याला बहुसंख्य शिक्षक हीन लेखतात. याचा विपरित परिणाम आदिवासी समाजातील मुलांच्या स्वप्रतिमेवर होतो.
   ४)      बहुसंख्य आदिवासी महिला आणि मुले आजही आदिवासी भाषा बोलतात. घटनेतील कलम ३५०अ अन्वये राज्यांनी मातृभाषेत शिक्षणाची व्यवस्था करणे अनिवार्य असताना शिक्षण व्यवस्था मात्र प्रस्थापित भाषेतून शिकण्याची सक्ती करत आहे. तसेच शालेय अभ्यासक्रमाचा आदिवासी मुलांच्या आयुष्याशी काहीही संबंध नसतो, उलट अनेकदा आदिवासी समाज व संस्कृतीबद्दल नकारर्थी मतप्रदर्शन केलेले असते.

या सर्व गोष्टींचा नकारात्मक परिणाम आदिवासी मुलांच्या शिकण्यावर होतो. शेवटी भुरिया असे निरिक्षण नोंदवतात की शालेय वर्षांमधे असे विविध पातळ्यांवर परकीकरण झालेले शिक्षित आदिवासी युवक-युवती अंतिमतः स्वतःच्या समाजापासून दुरावतात.

पडसऱ्यातला माझा याबाबतीतला अनुभव फारच बोलका होता. १०० दिवसांच्या आनौपचारिक शाळेत शिकवणारे आम्ही बहुसंख्य युवक-युवती मुलांच्या कलाने घेत, त्यांना रस असणाऱ्या, येणाऱ्या गोष्टींचा आधार घेत शिकवत असू आणि आमचा अनुभव असा होता की मुलेही ते आत्मसात करत. मुलांना शिकती होताना पाहून नंतर पालकांनीच स्वतःहून पूर्ण वेळच्या आश्रमशाळेची मागणी केली. 

आश्रमशाळा सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी मी एकदा मुलांना सहज भेटायला म्हणून गेले. पण १०० दिवसांच्या अनौपचारिक शाळेत भेटलेली, टोकदार व्यक्तिमत्वांची, आत्मविश्वासाने भरलेली, चैतन्यानं सळसळणारी मुले मला कोठेच दिसेनात. माझ्यासमोर होती ती मान खाली घालून, डोळे आत वळवून, काहीही बोलायला तयार नसलेली मुले.  त्यांच्यातला हा बदल पाहून मला दुःखही झाले आणि धक्काही बसला. संध्याकाळी याच मुलांना मी मैदानावर पाहिले. पुन्हा एकदा तीच उर्जा, तोच जोश आणि तोच पहिला आत्मविश्वास. मला पुन्हा माझी जुनी मुले गवसली. तेव्हा जाणवले, मुले आहेत तीच आहेत; दोष शाळेत किंवा शिक्षणपद्धतीत आहे, हे कुठेतरी मनात झिरपले.

पुढे ठिकठिकाणी पालकांशी-मुलांशी बोलताना लक्षात येत गेले की आयुष्यातील उमेदीची १४-१५ वर्षे शाळेत घालवल्यानंतरही भाकरीचा प्रश्न सोडवता येणार नसेल किंबहुना आयुष्यातली कुठलीच समस्या सोडवायला ते शिक्षण उपयोगी पडणार नसेल तर विशेषतः दारिद्र्यरेषेखाली राहणाऱ्या जनतेला आपल्या मुलांना शिक्षण देणे परवडणार नाही. शिकून काय होणार?’ या प्रश्नाचे त्यांना पटेल असे उत्तर आपल्या सध्याच्या शिक्षणव्यवस्थेत नाही. 

ना ते आयुष्यात स्वतःच्या पायावर उभे राहण्याजोगी काही कौशल्य देते, ना जगात वावरण्याचा आत्मविश्वास. शैक्षणिक काळातले बरे-वाईट अनुभव, यश-अपयश यांचा मुलांची स्वप्रतिमा घडवण्यात मोठा वाटा असतो. आपली शिक्षणव्यवस्था मुलांना ज्या प्रकारचे अनुभव देते, त्यातून आत्मविश्वासाचा अभाव असणारी, विचारहीन, हतबल व्यक्तीमत्वे घडण्याचेच प्रमाण जास्त दिसते. आधीच शोषित आणि अन्यायग्रस्त असलेल्या आदिवासी समाजाच्या बाबतीत तर ही अधिकच गंभीर बाब ठरते. स्वतःचा समाज, स्वतःची भाषा आणि स्वतःची संस्कृती यांची लाज वाटायला लावणारे, त्यापासून तोडणारे शिक्षण मुलांना नेमके कशाशी अर्थपूर्णरित्या जोडते हा प्रश्नच आहे.

या साऱ्याचा परिणाम म्हणून आपल्याला आदिवासी-ग्रामीण समाजातील मुले मोठ्या प्रमाणावर शिक्षणप्रवाहातून बाहेर फेकली जाताना दिसतात. २०११-१२ या वर्षात ४८%  आदिवासी विद्यार्थी उच्च प्राथमिक शाळांतून गळती झाले, ६२% आदिवासी विद्यार्थी माध्यमिक पातळीला गळती झाले.  (संदर्भ: Education Statistics at a Glance, MHRD 2013-14)

शिक्षणव्यवस्थेतून बाहेर ढकलली गेलेली ही मुले किंवा अगदी पदवीपर्यंतही पोहोचलेली ही मुले त्रिशंकू अवस्थेत जगत राहतात. विशेषतः ग्रामीण-आदिवासी भागातील अशी अर्धशिक्षित मुले त्यांच्या पारंपारिक व्यवसायांपासून आणि सामाजिक रचनेपासूनही तुटलेली राहतात. त्यांना शेतीत हात घालायची, श्रमाची कामे करायची लाज वाटते पण त्यांच्याजवळ पोट भरण्यासाठी आवश्यक असे दुसरे कौशल्यही नसते. नोकरी नावाच्या परिसस्पर्शाच्या शोधात ते एकतर बेकार बसून राहतात किंवा असंघटित क्षेत्रातील मिळतील ती कामे करत राहतात. 

मग प्रकर्षाने गरज जाणवत गेली ती अशा शिक्षणव्यवस्थेची जिची नाळ या मुलांच्या आयुष्याशी जोडलेली असेल आणि जी शालेय जीवनातच स्वतःच्या पायावर उभे रहायला मदत करणारे शिक्षण देईल. 

बहुसंख्य आदिवासी समाज हा सध्या शेतीवर आधारित जीवन जगत असल्यामुळे शिक्षणाला शेतीशी जोडून घेण्याचे प्रयोग पडसऱ्यात केले, पाठ्यपुस्तकातील गणित, विज्ञान या शेती प्रकल्पांशी जोडून घेतले. पुढे बायफ विकास अनुसंधान संस्थेद्वारा राबवल्या गेलेल्या शिक्षण-मित्र कार्यक्रमाची उभारणी संपूर्णपणे याच विचारधारेवर आधारित अशी झाली – शेती, आरोग्य आणि नागरिकत्वाचे शिक्षण हे त्याचे मुख्य घटक होते. या कार्यक्रमाचा मुख्य गाभा सुदृढ स्वप्रतिमा असणारी, सारासार विचार करू शकणारी, संवेदनशील व्यक्तिमत्वे तयार होण्यासाठी आवश्यक ते अनुभव देणे असाच होता. 


शिक्षण-मित्रच्या कामाच्या माध्यमातून मुलांचे आत्मभान जागवण्याचे आमचे प्रयत्न आणि मुलांधल्या क्षमतांची आम्हाला झालेली ओळख पुढील काही लेखांमधून. 

(या लेखाची प्रथमावृत्ती 'मिळून साऱ्याजणी' या मासिकाच्या फेब्रुवारी २०१७ या अंकात प्रकाशित झाली आहे)

4 comments:

  1. सुंदर लेख आणि समर्पक शीर्षक राजश्री.. आदिवासी धोरण आणि शिक्षण-धोरणात या अनुभूतीचीच वानवा असते,नाही का?

    ReplyDelete
  2. धन्यवाद सीमा! वाचकांच्या प्रतिक्रीयांमधून लिहिण्याची उमेद वाढते. तू म्हणतेस ते अगदी खरंय्. राज्यकर्ते आणि प्रशासक या दोघांमधेही या अनुभूतीची वानवा दिसते. तरी महाराष्ट्रासारख्या राज्यात जिथे सामाजिक कामांची, चळवळींची पार्श्वभूमी आहे तिथे थोडी का होईना जाणीव जागृत होताना दिसते आहे. बहुभाषिक धोरण, समता कक्षाची स्थापना व समता धोरण असे काही निर्णय शिक्षण विभागामधे होताना दिसत आहेत. आदिवासी विभागात बदल व्हायला पाहिजे याची जाणीव सर्वोच्च पातळीला का होईना पण दिसते आहे. मात्र अजूनही बरीच मोठी वाट चालणे बाकी आहे. धोरण आणि प्रशासन खऱ्या अर्थाने तेव्हाच बदलतील जेव्हा दृष्टीकोनात बदल येईल. खरं तर या तीनही एकमेकांत गुंतलेल्या गोष्टी आहेत, नाही का?

    ReplyDelete
  3. Nitin Kamble writes

    Dear Rajashritai,

    खूपच छान ब्लॉग लिहिला आहे. आज सकाळी वाचला आणि आपल्या जिल्ह्याच्या टीमला हि पाठविला आहे. खरच खूप छान लिखाण आणि प्रवास आहे. असेच लिखाण करा.

    धन्यवाद !

    आपला
    नितीन

    ReplyDelete