Saturday, September 16, 2017

शाळा गावात गाव शाळेत



मुलांना जसा आत्मविश्वास आला तसं त्यांनी आणखी एक जबाबदारी खांद्यावर घेतली. आपल्याच वर्गमित्रांना शिक्षण-मित्र उपक्रमातील गोष्टी शिकवण्याची. विद्यार्थी समित्यांमधल्या अनुभवी मुलांनी आपल्या शाळेतल्या इतर मुलांना किंवा समितीत नव्याने दाखल झालेल्या मुलांना गांडूळखताची प्रक्रिया, परसबाग, फळबाग किंवा फुलबाग लागवडीची पद्धती, बीज निवड आणि बीज प्रक्रीया करण्याच्या पद्धती, हात धुण्याची पद्धत, पाणी शुद्धिकरणाच्या घरगुती पद्धती, जलसंजीवनीचा (ORS) वापर, रक्तपांढरी (anaemia) कशी ओळखावी व त्यावर काय उपाय करावे, संतुलित आहार म्हणजे काय आणि तो का आवश्यक आहे, जन्म दाखला, जातीचा दाखला यांचे महत्त्व काय आणि ते कसे मिळवावे, बॅंकेत खाते कसे उघडावे, विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या, बॅंकेच्या कोणत्या योजना आहेत अशा विविध विषयांवर माहिती द्यायला सुरवात केली. ते त्यांचे सवंगडी प्रशिक्षक बनले. 


जसा मुलांचा स्वतःवरचा आणि आमचा मुलांवरचा विश्वास वाढला तसं आम्ही आणखी एक प्रयोग केला. दरवर्षी आम्ही गंमत-शिक्षण मेळावा घेत असू. यांत एका तालुक्यातील शिक्षण-मित्र कार्यक्रमात सहभागी असलेल्या विविध आश्रमशाळांतील मुलांना एकमेकांना भेटायची, एकमेकांकडून शिकायची संधी मिळायची. गंमत-शिक्षण मेळाव्यामधे सहसा ठरवलेल्या थीमनुसार बाहेरचे मार्गदर्शक बोलावले जात. पण त्या वर्षी आम्ही ठरवले की शिक्षण-मित्र कार्यक्रमात तयार झालेली मुलेच या वर्षी मार्गदर्शक म्हणून काम करतील. त्या वर्षीची थीम ठरली – करता-करता शिका. दाखले मिळवण्याची प्रक्रीया, दाखल्यांचे महत्त्व, अधिकारी व त्यांचे संबंधित ऑफिस यांच्या जोड्या लावणे, बॅंकेत बचत खाते उघडणे, खात्यात पैसे भरणे व काढणे, मुदत ठेव खाते उघडणे असे बॅंकेचे व्यवहार, बीज निवड, बीज प्रक्रीया, गांडूळ खत, सेंद्रिय कीटकनाशक तयार करण्याच्या प्रक्रीया संगतवारीने सांगणे, बॉडी-मास इंडेक्स पाहणे, पौष्टीक भेळ तयार करणे, तालुक्याचा व जिल्ह्याचा नकाशा वाचणे, लीटर, ग्रॅम व मीटर मधे मोजणे अशा विविध स्टॉल्सवर सवंगडी प्रशिक्षक म्हणून विद्यार्थी उभे राहिले. 


नंदूरबारमधे संपूर्ण जिल्ह्यात ६ तालुक्यात मिळून एकूण ७ मेळावे झाले. प्रत्येक मेळाव्यात १०० ते १५० मुले याप्रमाणे एकूण ४७ शाळांतील ८६० मुले ५० शिक्षकांसह यांत सहभागी झाली. त्यांना समित्यांमधूनच निवडलेल्या एकूण ७० सवंगडी प्रशिक्षकांनी संपूर्ण तयारीनिशी मार्गदर्शन केले. रविंद्र वसावे हा त्यातीलच एक सवंगडी मार्गदर्शक. त्याने कथन केलेला इतर मुलांना शिकवण्याचा त्याचा अनुभव खाली त्याच्याच भाषेत दिलेला आहे.

आमान पाहला दिही गुरज्य कोयनो के आपूने शालायन गंमत शिक्षण मेलावळू पाउनू होय. तो मान निस्ती बिख लागनी. बिहरा पोयरान किवानी हकवूनू की कोईत हीकवूनू, अन ते आपान किबी परसन फुसे, ताहा उत्तर कोमन ताहा माहू वाहीक हाज नागनो ताहरेल बीहऱ्य शालायअ पोयरे आवने नजाअ खीज बिखलागी वलनी ताहरअ बीहरा दिही माहू खेत बद्दल हमजाळन ईही कोयन लाहरअ मे खेतम पेअनु काजो बिये कि कोईत भणवनूअ अन काअना खतमेहे बेळनूउ ते मे पोयरान हिकवूउ न अन फासअ गांडूळखत कि कोईत बणवनूउ अन पाई की कईत शुद्ध आअनुउ तो मे पोररान हिकवूनूउ आअखे ज पाने रागिम मे कित आहरे ते पाने ओअखावनूउ न ईहीई मे पोयरान हिकवूअनो आय.
(भाषा – भिलोरी)
रविंद्र विजा वसावे, अनुदानित आश्रमशाळा, रायसिंगपूर, ता. अक्कलकुवा, नंदुरबार

अनुवाद – आम्हाला पहिल्या दिवशी गुरूजींनी सांगितले की आपल्या शाळेत गंमत-शिक्षण मेळावा पहायला मुले येणार आहे. तर मला फार भीती वाटली. दुसऱ्या मुलांना काय शिकवायचे आणि कसं शिकवू? त्यांनी प्रश्न विचारले तर त्यांचं उत्तर सांगितलं तेव्हा मला थोडं बरं वाटलं. दुसऱ्या दिवशी कोणत्या शेतात, कोणतं बियांणं कसं पेरायचं ते मी सांगितलं आणि नंतर गांडूळखत कसं तयार करायचं आणि पाणी कसं शुद्ध करायचं आणि पानं कशी ओळखायची हेही मुलांना शिकवलं  

सुट्टीमधे मुले घरी जात तेव्हा मुलांना आम्ही काही प्रकल्प देत असू. त्यात प्रात्याक्षिक प्रकल्प आवर्जून दिले जात. मुले पाणी शुद्धिकरणाच्या घरगुती पद्धती, जलसंजीवनी तयार करण्याची पद्धत, गांडूळखत किंवा कसे तयार करावे या गोष्टी घरी पालकांना किंवा गावामधे गावकऱ्यांना करून दाखवत. सुट्टीच्या काळात शिकलेल्या गोष्टींशी संपर्क तुटू नये हा त्याचा एक उद्देश होताच पण त्याहून महत्त्वाचा उद्देश होता तो त्यांनी शिकलेल्या गोष्टी स्वतःच्या घरापर्यंत, गावापर्यंत पोचवाव्या. दुर्गम आदिवासी भागामधे, जेथे सर्वच प्रकारची संपर्क साधने कमी आहेत, तेथील लोकांसाठी अजूनही शाळा ही बाहेरच्या जगाची खिडकी आहे. अशा भागामधे शाळेने शिक्षक आणि मुलांच्या सहभागाने आजूबाजूच्या परिसरासाठी विकास केंद्र बनावे असे उद्दीष्ट शिक्षण-मित्र कार्यक्रमाने ठेवले होते. त्यामुळेच मुलांनी शाळेत शिकलेल्या गोष्टी घरी-गावात जाऊन सांगाव्या यासाठी विशेष उपक्रम आखले. 
पुढे जाऊन तर गंमत-शिक्षण कार्यक्रमामधे तयार झालेल्या मुलांनी ७ गावांमधे गावशिक्षण मेळावे घेतले. प्रात्यक्षिकांमधून बीजनिवड, बीजप्रक्रीया, संतुलित आहार, रक्तपांढरी, body-mass index, वेगवेगळे दाखले यांची माहिती गावकऱ्यांना दिली. 
यांतून आश्रमशाळेत शिक्षण-मित्र कार्यक्रमातून आपली मुले काय-काय शिकत आहेत हे पालकांपर्यंत, गावकऱ्यांपर्यंत पोचले. कित्येक पालक त्यानंतर आश्रमशाळेत येऊन फळझाड लागवड कशी करावी किंवा फुलशेती करता येईल का अशी चौकशी करू लागले किंवा गावात येणाऱ्या बायफच्या कर्मचाऱ्याला गाठू लागले. सुनिल या सुरगस शाळेतील विद्यार्थ्याच्या पुढाकाराने गावातील महिलांनी बॅंकेत खाते उघडले. 

अर्थात शाळा-गाव अशी देवाण-घेवाण दुहेरी होती. जसे आश्रमशाळांनी, शिक्षण-मित्रच्या मुलांनी पुढाकार घेऊन गावांतील शेतकरी, महिला यांना काही गोष्टी शिकवल्या तशा बायफच्या शेती कार्यक्रमात सहभागी असलेल्या आदिवासी शेतकऱ्यांनी आश्रमशाळांमधे येऊन मुलांना शेतीचे तंत्रज्ञान शिकवले, 
नवीन शेतीपद्धतींची माहिती दिली. कधी स्वयंसहाय्यता गटाच्या महिलांनी येऊन आरोग्यविषयक माहिती दिली, पौष्टिक पाककृती शिकवल्या. कधी गावातील पोलिस पाटीलांनी येऊन कायदा-सुव्यवस्थेबद्दल माहिती दिली तर कधी सरपंचांनी येऊन ग्रामपंचायतीच्या कामाबद्दल माहिती दिली. मुले वेगवेगळ्या सहलींच्या निमित्ताने शेतकरी, सहकारी सोसायट्यांचे सदस्य, विकासाची कामे करणारे गावकरी यांना भेटली. त्यांच्याकडून वेगवेगळ्या गोष्टी शिकली, आपल्या प्रयत्नांतून आपले कुटुंब, आपले गाव यांचा विकास कसा साधता येतो हे शिकली.  
आदिवासी शेतकरी, महिला, पालक यांना प्रशिक्षक म्हणून आश्रमशाळेत आणण्यात शिक्षणमित्र कार्यक्रमाचा एक हेतू होता. सहसा आदिवासी समाजाबद्दल एक हीनत्वाची भावना ही शाळेच्या वर्तुळात पहायला मिळते. या निरक्षर, अडाणी समाजाला शिकवून काढायला हवे, आपणच त्यांचे उद्धारकर्ते अशा भावनेत सहसा पांढरपेशा शिक्षित समाज असतो व त्यात शिक्षक आघाडीवर असतात. त्यांच्याकडून आपल्याला काही शिकण्यासारखे असू शकते अशी कल्पनाही मनाला शिवत नाही. आदिवासी समाजातील शिकली-सवरली मुले किंवा अगदी आदिवासी शिक्षकही आपल्या समाजाबद्दल, समाजबांधवांबद्दल हाच न्यूनगंड घेऊन वावरत असतात. त्याचे प्रतिबिंब आश्रमशाळांमधे दिसतेच. शिक्षण-मित्रच्या मुलांनी हा न्यूनगंड बाळगू नये यासाठी आम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न केले. शेतकरी पालकांना शाळेत बोलावणे हा त्याचाच एक भाग होता. आदिवासी शेतकरी आदिवासी भाषेत मुलांशी सहज संवाद साधत, परसबाग, फुलशेती, फळशेती शिकवताना परिसर अभ्यासाच्या पुस्तकातल्या वनस्पतीची वाढ, विविध अवयवांची कार्ये, कीड लागण्याची कारणे, लक्षणे आणि उपाय अशा कितीतरी गोष्टी ते अगदी सोपेपणाने पण प्रभावीपणे सांगत. आपणच काय पण काही वेळा बायफचे डिग्री घेतलेले कर्मचारी पण इतक्या सोपेपणाने गोष्टी विशद करू शकत नाहीत हे शाळेतले शिक्षक अनुभवू लागले. त्यांची आदिवासी शेतकऱ्यांकडे बघण्याची दृष्टी किंचित बदलू लागली. आश्रमशाळेतल्या एखाद-दुसऱ्या कार्यक्रमाला परिसरातला प्रयोगशील आदिवासी शेतकरी किंवा कर्तृत्ववान महिला व्यासपीठावर मानाच्या खुर्चीत दिसू लागली. 

सुट्टीमधे प्रात्यक्षिक प्रकल्पांच्या जोडीला संकलन प्रकल्पही आम्ही देत असू. रानभाज्यांची, कंदांची माहिती गोळा करणे, विविध धान्यांची स्थानिक वाणे गोळा करणे व त्यांचे उपयोग माहिती करून घेणे अशा प्रकल्पांसाठी मुलांना गावातल्या माहितगार बुजूर्ग माणसांशी बोलावे लागायचे. यातून अडाणी मानल्या जाणाऱ्या या माणसांजवळ माहितीचा केवढा खजिना आहे हे मुलांच्या आणि त्यांच्या शिक्षकांच्या लक्षात यायचे. या समाजाने विकसित केलेली अन्नसुरक्षेची एक व्यवस्था आहे, दुष्काळ किंवा नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्याच्या युक्त्या आहेत हे त्यातून उलगडत जायचे. 

याजोडीला विविध प्रसंगी म्हटल्या जाणाऱ्या लोकगीतांचा तसेच लोककथांचा संग्रह असेही प्रकल्प दिले. आदिवासी भाषेला लिपी नसली तरी मौखिक स्वरूपातले वाड्मय याही भाषांमधे आहे, त्यातून समाजाचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन, स्पंदने, बदलाच्या पाऊलखुणा हे सर्व व्यक्त होते आहे, याचे भान व संवेदना सहसा शाळांमधे नसतेच. आदिवासी भाषा शाळेच्या परिसरात बोलली तर शिक्षा, अशीच रीत असते. पण आपली भाषा, आपल्या समाजाकडे असलेल्या विशेष कौशल्यांची सार्थ जाणीव आणि त्याबद्दलचे ममत्व मुलांच्या मनात असावे आणि त्याबद्दलची सकारात्मक स्वीकृती शिक्षकांमधे यावी यासाठी हे प्रयत्न होते. असंख्य लोकगीते शाळा-शाळांतून संग्रहित झाली. मग दामूदादा ठाकरे या आदिवासी एकता परिषदेच्या ज्येष्ठ्य कार्यकर्त्यांच्या मदतीने यातली गीते निवडली आणि त्यांच्या अनुवादासह त्याचे एक छोटी पुस्तिका छापली. आपण गोळा केलेल्या आपल्याच भाषेतील गाण्यांची ती पुस्तिका पाहताना मुलांना आनंदही वाटला आणि अभिमानही. 


भिल आणि पावरा समाजाच्या स्त्री-पुरूषांना चाक न वापरता मातीची भांडी हातानेच घडवण्याची कला अवगत आहे. वेगवेगळ्या आकाराची व प्रकाराची भांडी गरजेनुसार घडवली जातात आणि त्या प्रत्येक भांड्याला एक विशिष्ट नाव आहे. काही शाळांतल्या मुलांनी या भांड्यांचे तसेच त्यांच्या समाजात दैनंदिन गरजांसाठी वापरल्या जाणाऱ्या इतर वस्तूंचे जसे मासे पकडायची जाळी, शेतातून धान्य वाहून नेण्यासाठी वापरले जाणारे बांबूचे साधन, स्वयंपाकघरातील व शेतातील इतर अवजारे, कपडे अशा अनेक गोष्टींचा संग्रह केला. अनुदानित आश्रमशाळा, जमाना या शाळेत या वस्तूंचे एक संग्रहालय उभारले. त्याचे नाव मुलांनीच ठरवले – डोगो भागो जुनो बिढारो कोहो म्हणजे डोंगरातील जुन्या वस्तूंचे घर. या संग्रहालयाचे उद्घाटन झाले... ते फीत कापून नव्हे तर मुलांनी सुचवल्याप्रमाणे कामठ्यामधून तीर मारून!
इतरही दोन शाळांमधे अशी संग्रहालये तयार झाली. 

शाळा आणि गाव यातले अंतर कमी करण्याचा, शाळेतल्या शिक्षणाचा सांधा मुलांच्या आयुष्याशी जोडून शाळा आणि शिक्षण याबद्दलचा परकेपणा कमी करण्याचा प्रयत्न आम्ही शिक्षण-मित्रच्या माध्यमातून केला आणि काही प्रमाणात त्यात यशस्वीही झालो.

जीवन हे बहुआयामी असते, त्यामुळे कोणे एके ठिकाणी, कोणा एकाच व्यक्तीला विविध आयामांना स्पर्श करणारे, सामावून घेणारे शिक्षण देणे अवघडच आहे. पण आपल्याकडची शिक्षणपद्धती ही शाळा या परिघात बंदिस्त झालेली आणि शिक्षक नावाच्या एका खांबाभोवती बांधली गेलेली आहे. काही दशकांपूर्वी शाळा ही संस्था मुलांच्या आयुष्यात इतकी सर्वव्यापी झालेली नव्हती. कुटुंब, शेती, कुटुंबाच्या व्यवसायाची ठिकाणे, खेळाची मैदाने, उत्सव, जत्रा-यात्रा, नातेवाईकांची घरे, गावातील विविध ठिकाणे यांत मुले वावरत असत आणि तेथे जगण्याचे शिक्षण मिळत होते. सध्या शहरांमध्ये शाळा या संस्थेने मुलांच्या आयुष्यातला एवढा मोठा भाग व्यापला आहे की सकाळचा नाष्टा आणि दुपारचे जेवण यांचीही जबाबदारी शाळाच घेते. गृहपाठही शाळेतच होतो. मुलांच्या शिकण्याशी, त्यांच्या वाढीशी असलेला पालकांचा एवढाही संबंध अशी शिक्षणव्यवस्था तोडत आहे.  

अपरिहार्यतेमुळे का होईना पण आदिवासी पालकांच्या बाबतीत हेच झाले आहे. आश्रमशाळेत वाढणाऱ्या मुलांच्या पालकांना त्यांचे मूल महिनोन् महिने भेटत नाही. स्वतःच्या मुला/मुलीची शारिरीक आणि बौद्धिक वाढ ते अनुभवू शकत नाहीत. दुसरीकडे शाळेच्या औपचारिक, कृत्रिम वातावरणात राहणारे हे मूल रशरशीत, जिवंत अशा जीवनानुभवाला पारखे होते. यासाठी घरातले, गावातले काही अनुभव शाळेत आणणे आणि त्याजोडीला पालकांना, गावकऱ्यांना शाळेशी जोडून घेऊन मुलांच्या वाढीचे नुसते साक्षीदार नव्हे तर भागीदार बनवणे हे घडायले हवे. शिक्षण-मित्रने तेच केले.
(मिळून साऱ्याजणीच्या जून १७ च्या अंकात पूर्वप्रकाशित)









3 comments: