तळोदा तालुक्यातील
अमोणी आश्रमशाळेत परसबागेत मेथीची भाजी भरपूर पिकली. मुलं ती खाण्याची वाट बघत
होती. परसबाग समितीचा अध्यक्ष पंडित पावराने मात्र ती विकायचा पर्याय मांडला.
पंडितला वाटत होतं, बायफने कुदळ-फावडी असं सगळं लागणारं सामान पुरवलं आहे पण आणखी
लागलं तर त्यांच्याकडे मागण्यापेक्षा आपलं आपल्याला घेता आलं पाहिजे, त्यासाठी
आपले स्वतःचे हक्काचे पैसे असले पाहिजे. पण इतर मुलांनी विरोध केला. त्यांना भाजी
खायची होती. बाहेर विकायची की शाळेच्या स्वयंपाकघरातच शिजवून खायची असा प्रश्न उभा
राहिला तेव्हा पंडितने त्यावर असे काही उत्तर शोधले की मुलांना ती भाजी खायला तर
मिळालीच पण त्याचवेळी त्याच भाजीची विक्री करून त्यांनी पैसेही मिळवले. त्याने सरळ
शाळेला भाजी पुरवणाऱ्या कंत्राटदाराला गाठले. त्याला विचारले, ‘आमच्याकडून मेथी
विकत घेता का? ५ रू.
किलोने देऊ. फक्त ती आमच्याच शाळेला विकायची.’ कंत्राटदार कां कू करायला लागला. ‘मला पक्की पावती लागेल’ असा बिनतोड मुद्दा
काढला. शाळेतली परसबाग समितीची मुले छापील पावती नक्की देऊ शकणार नव्हती पण
पंडितने त्यावरही हार मानली नाही. त्याने शाळेतल्या मुख्याध्यापकांची मनधरणी करून
त्यांच्याकडून शाळेच्या सही-शिक्क्याचे पत्र लिहवून घेऊन ते कंत्राटदाराला दिले.
मुलांना त्यांनी पिकवलेली भाजी खायला मिळाली आणि त्याच भाजीचे रू. ५५०/- परसबाग समितीने
मिळवले. ‘To eat the cake and have it too’ हे पंडितने साध्य करून दाखवले. नंतर समितीच्या
सर्व मुलांना विश्वासात घेऊन त्याने जास्तीचे कुदळ-फावडे त्या पैशातून खरेदी केले.
तरीही काही पैसे उरले. बायफने कपडे वाळत घालायला तारा दिलेल्या होत्या, उरलेल्या
पैशातून समितीने चिमटे विकत आणले. पंडित म्हणतो, ‘अनेक मुलांना चिमटे मिळाल्याने मला
मुलांची मनं जिंकता आली.’
प्रत्येक उपक्रमाची
जबाबदारी घेणाऱ्या विद्यार्थी समित्या हा शिक्षणमित्र कार्यक्रमाचा आत्मा होता. या
समित्यांच्या माध्यमातून विद्यार्थी नेतृत्व कसं आकार घेत गेलं हे आपल्याला वरच्या
प्रसंगात दिसतच आहे. पंडितने केवळ निर्णयक्षमताच दाखवली असं नव्हे तर चौकटीबाहेरचा
कल्पक विचार करण्याची क्षमताही दाखवली. इतर विद्यार्थ्यांच्या गरजांचा, त्यांच्या
मनाचा विचार करण्याची संवेदनशीलताही दाखवली. कंत्राटदार, मुख्याध्यापकांशी चर्चा
करण्याचे धाडस, लाल फितीच्या प्रश्नांवर व्यावहारिक तोडगा काढण्याचे चातुर्य अशा
कितीतरी क्षमता वरच्या एका प्रसंगात या मुलाने प्रकट केल्या.
आदिवासी मुलांकडे
केवळ गरीब, बिचारी, शोषित अशा नजरेने पाहताना त्यांच्यातल्या या क्षमता दृष्टीआड
केल्या जातात. ‘शिक्षणमित्र’च्या कोंदणात
त्यांना झळाळी मिळाली.
सुरूवातीला सर्वच
शाळांमध्ये शिक्षक सर्रास मुलांच्या परसबागेतील भाजी न विचारता तोडून घेऊन जात.
जशी मुलांनी उपक्रमांची संपूर्ण जबाबदारी घेतली, तसे त्यांनी त्यांचे कायदेकानून
राबवायला सुरूवात केली. अनुदानित आश्रमशाळा, चांदसैली येथील मुलांनी न विचारता
भाजी घेणाऱ्या व्यक्तीला २० रू. दंड ठेवला. त्यानंतर दोन शिक्षकांनी न विचारता
भाजी तोडल्यावर रजिस्टरमध्ये ‘xxx व xxx यांनी भाजी चोरली.’ अशी नोंद केली आणि सर्व समिती सदस्यांनी
जाऊन दंड मागितला. पुढे या शाळेत काम करणाऱ्या बायफच्या दादांच्या मध्यस्थीने ‘भाजी चोरली’ ही नोंद बदलून ‘
भाजी न विचारता
घेतली’ असा
सौम्य अविष्कार दस्त झाला. शिक्षकांनी मोठ्या मनाने त्यांची चूक मान्य केली आणि
समितीने ठरवलेला दंड भरला.
निवासी शाळांमध्ये
मुलं सर्वस्वी शिक्षकांवर अवलंबून असतात. अशा परिस्थितीत त्यांनी शिक्षकांकडे
दंडाची मागणी करण्याचे धाडस दाखवणे ही सोपी गोष्ट नव्हती. जबाबदारी घेण्यातून आणि
समितीच्या रूपाने एकवटलेल्या बळातून त्यांना हा आत्मविश्वास आणि हे धाडस आले.
अर्थात
आत्मविश्वासाने स्वतंत्र विचार करून निर्णय घेणाऱ्या आत्मनिर्भर विद्यार्थी
समित्यांचे चित्र वास्तवात येणे हे इतके सोपे नव्हते. विशेषतः आपल्या समाजात जिथे ‘लहानांनी
मोठ्यांच्या आज्ञा पाळणे’ हे फार मोठे मूल्य मानले जाते, कायद्याने सज्ञान झालेल्या
मुला-मुलीनांही स्वतःचा अभ्यासक्रम, करिअर, जीवनसाथी निवडण्याची मुभा सहजासहजी
मिळत नाही, तिथे मुलांनाही मते असतात, विचारक्षमता असते आणि मुलांना निर्णय
घेण्यासाठीचा अवकाश मिळायला पाहिजे, असा विचार मान्य होणे जवळपास अशक्यच होते.
त्यासाठी आम्हाला सुरुवातीची ५-६ वर्षे फार मेहनत घ्यावी लागली.
‘मुलांनी
नियोजनापासून कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसह त्याच्या मूल्यमापनापर्यंत प्रत्येक
टप्प्यावर सक्रीय सहभाग घ्यावा यासाठी मुलांच्या समित्या करू’ असा प्रस्ताव
सुरुवातीला शिक्षकांच्या कार्यशाळेत खुल्या चर्चेला ठेवला तेव्हा खरोखरच त्यावर
खडाजंगी चर्चा झाली. मुलांना निर्णयाचे वगैरे अधिकार दिले तर ‘मुले डोक्यावर बसतील’,
‘ती मिरे वाटतील’,
‘मुले विध्वसंक असतात’,
या शिक्षकांनी
केलेल्या टिप्पणी आजही आठवतात.
सर्व सहभागीधारकांचा
सहभाग व सहमती हा ‘शिक्षण-मित्र’चा नियमच असल्यामुळे
मुलांच्या समित्यांच्या निर्णयाचीही खुली चर्चा त्यांच्याबरोबर केली गेली.
सुरुवातीच्या गरमागरम प्रतिक्रीयांनंतर संवादाला सुरुवात झाली. मुलांच्या
सकारात्मक सहभागाची काही उदाहरणे शिक्षकांना सांगितली. स्वातंत्र्य म्हणजे
मोकाटपणा लव्हे तर समित्यांच्या माध्यमातून मुलांना जबाबदारीची जाणीव कशी रूजवली
जाईल याविषयी बोलणे झाले. ‘१०वी फ’ हा चित्रपटही शिक्षकांना दाखवला आणि विध्वसंक
वृत्ती का निर्माण होते आणि मुलांची शक्ती आणि बुद्धी सकारात्मक दिशेला वळविणे हाच
त्यावरचा खरा उपाय असू शकतो अशीही चर्चा झाली. अखेरीस शाळांमध्ये समित्या स्थापन
झाल्या.
प्रत्येक समितीत
मुला-मुलींची संख्या समान असावी असे बंधनकारक असले तरी समाज मनातला लिंभेद समिती
स्थापनेतही प्रतिबिंबित होत होता. त्यामुळे वाडी (फळझाड लागवड) समितीत सर्व मुले
आणि स्वच्छता समितीत सर्व मुली असे चित्र सहजच दिसत असे. काही वेळा समितीत मुलींना
स्थानच नसे. ‘बायका
शेतात काम करत नाहीत का? जर
शेतीतही कामाचा वाटा बायकाच जास्त उचलत असतील तर त्यांना त्यातले आधुनिक तंत्र का
माहित करून नाही द्यायचे?’ अशा चर्चा प्रतिवाद करत हळूहळू परिस्थितीत बदल
आणावे लागले. मुलींनाही ही संधी मिळाली पाहिजे हे भान नसणे येथपासून मुलींना
जमणारच नाही, मुलींनी हे करू नये अशा विचारापर्यंत लिंगभेदाच्या पातळीची विविधता
दिसे. अगदी संथ गतीने पण हळू-हळू बदल होत गेले.
खरं तर समिती रचना
ही काही आश्रमशाळेमध्ये नवी नव्हती. तिथे अभ्यास समिती, स्वच्छता समिती, परिपाठ
समिती अशा समित्या होत्याच. याखेरीज कुलपद्धतही होती. प्रत्येक वर्गात बिरसा मुंडा
कुल, एकलव्य कुल, शबरी कुल असे गट होते आणि त्यांनी विविध जबाबदाऱ्या घेणे
अपेक्षित होते. पण काही सन्माननीय अपवाद वगळले तर समित्या आणि कुले निव्वळ कागदावरच
आढळायची. चांगली ताकद असलेल्या या रचना कार्यवाहीअभावी निरुपयोगी व्हायच्या.
यामुळेच ‘शिक्षण-मित्र’मध्ये प्रत्यक्ष काम
सुरू झाले म्हणजेच समिती अस्तित्त्वात आली असा प्रघात केला. उदा. खरूज
सर्वेक्षणाच्या कामाला निवडक मुलांना मदतीला घेतले आणि मग त्यांचीच गट म्हणून
नोंदणी केली. परसबाग सुरू केल्यावरच परसबाग गट करणे अपेक्षित असे. कागदावरच्या
समितीला गृहित धरले जाणार नाही असा नियम होता. समित्यांची १५ दिवसांतून एकदा बैठक
झालीच पाहिजे असाही आग्रह धरला होता. आपण निवडलेल्या उपक्रमांची आखणी व नियोजन
करणे, जबाबदाऱ्यांचे वाटप करणे, झालेल्या कामाचा आढावा घेणे, त्यांची नोंद करणे,
काही अडचणी असतील तर त्यांची चर्चा करून त्यावर निर्णय घेणे या सर्व जबाबदाऱ्या
खऱ्या अर्थाने मुलांनी घ्याव्या यासाठी समिती बैठक ही आवश्यक रचना होती.
विद्यार्थी
समित्यांबरोबरच्या बैठकींचे चित्र सुरुवातीच्या काळात फारच गंमतीशीर असे. शाळेच्या
प्रथेनुसार खुर्च्यांची मांडणी पाहुण्यांसाठी केली जाई. विद्यार्थी समितीचे सदस्य
पुढे सभेला बसल्याप्रमाणे एकगठ्ठा ओळीने बसत. मग ही बैठक रचना बदलायला लागे. ‘विद्यार्थ्यांशी
समान पातळीवर बोलायचे आहे’, ‘चर्चा अपेक्षित आहे’ अशी शिक्षकांची समजूत काढावी लागे.
विद्यार्थ्यांना गोलात बसवून त्यांच्याबरोबर जमिनीवरच बसले म्हणजे शिक्षकांना फारच
कानकोंडे होई. प्रौढांनी, त्यातही मार्गदर्शकांनी (मुलांबरोबर प्रौढांचे नाते
शाळेच्या लेखी सहसा मार्गदर्शकाचेच असायचे) मुलांच्या बरोबरीने जमिनीवर बसून बोलणे
हा शाळेच्या दृष्टीने भयंकर विचित्र किंवा रूढीबाह्य प्रकार होता. अशा वेळी
शिक्षकांना प्रश्न पडायचा की आता त्यांनी कोठे बसावे? काही शिक्षक बुचकळ्यात पडून उभेच राहत, तर
काही मुलांच्या पेट्यांवर बसण्याचा मध्यम मार्ग पत्करत, काही मात्र स्वतःच्या उच्च
स्थानाच्या खात्रीपोटी किंवा रूढ प्रथेच्या विश्वासापोटी आमची पर्वा न करता
खुर्चीवरच ठामपणे बसत.
पण मुलांबरोबर
जमिनीवर बसण्याच्या आमच्या नियमाला आम्ही घट्ट चिकटून राहिलो. या पहिल्या कृतीतून
मुलांच्या मनात आमच्याबद्दल उत्सुकता आणि जवळीक निर्माण होत असे. मैत्रीच्या आणि
आश्वासक सुरात बोलण्यात बोलण्याने हळू-हळू भीड चेपत असे आणि मग एक-एक जण बोलत होत.
सुरुवातील हे बोलणे
स्वतःचे नाव. समितीचे नाव आणि समितीतले आपले पद एवढेच सांगण्यापुरते मर्यादित
होते. एवढे बोलण्यासाठीही पुष्कळ प्रोत्साहन आणि धीर द्यावा लागे. बोलताना मुले
खाली मान घालून, नजर जमिनीवर खिळवून, तोंडातल्या तोंडात पुटपुटत बोलत. समितीचे काम
सांगणे किंवा बरोबरीच्या
पातळीवर चर्चा करणे ही तर फारच दूरची गोष्ट होती.
पण समिती बैठकीच्या आग्रहामुळे मुलांना आणि
शिक्षकांनाही समितीच्या अस्तित्त्वाचे भान येत गेले. अमुक उपक्रमासाठीचा आपला
वेगळा गट आहे आणि त्या गटात आपण अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव किंवा सदस्य आहोत ही
मुलांच्या मनातली ओळख पक्की होत गेली. त्याबरोबरच ती शाळेतली इतर मुले, शिक्षक,
मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मनात ठसत गेली. समितीची identity तयार झाली. हळू-हळू समितीची रचना बसत गेली. हळू-हळू शिक्षकही समिती बैठकीत मुलांच्या बरोबरीने बसू लागले.
समित्यांबरोबर दर आठवड्याला ‘ बायफ-मित्र’च्या कर्मचाऱ्यांच्या भेटी होत असत. त्यात
त्यांच्याबरोबर सत्रे घेऊन शेती, आरोग्य, शासनाच्या योजना, महत्त्वाची कागदपत्रे
जसे जन्मदाखला, जातीचा दाखला अशा विविध विषयांची माहिती दिली जाई. कधी तयार
केलेल्या बागांमध्ये थेट जाऊन जन्मदाखला, जातीचा दाखला अशा विविध विषयांची माहिती
दिली जाई; कधी तयार केलेल्या बागांमध्ये थेट जाऊन लागवड
कशी करावी, फवारणी कशी करावी, कलम कसे बांधावे अशा विषयांवर प्रत्यक्षिक प्रशइक्षण
होई. कधी चक्क या विद्यार्थ्यांची छोटीशी सहल निघे आणि तालुक्याच्या गावी जाऊन
बॅंक, प्राथमिक आरोग्य केंद्र, पोलिस स्टेशन, ITI, पंचायत समिती अशा
विविध ठिकाणी जाऊन मुले माहिती घेऊन येत. कधी बायफ-मित्रचे काम चालू असणाऱ्या
एखाद्या गावात शेती विकासाचे, शेतकऱ्यांच्या-महिलांच्या सहकारी सोसायट्यांचे काम
बघून येत. एकूणात दर आठवड्यात या मुलांजवळ काहीतरी नव्या माहितीचा साठा निर्माण
होत असे. दर आठवड्यात त्यांनी काहीतरी नवीन आणि इंटरेस्टिंग गोष्ट करून पाहिलेली
असे. त्यांच्याजवळ सांगण्यासारख्या पुष्कळ गोष्टी निर्माण होत गेल्या, तसे त्यांचे
शाळेतले स्थानही बदलत गेले. ‘शिक्षण-मित्र’ची समिती ही मुलांना प्रिव्हीलेज्ड पोझिशन वाटू लागली.
विद्यार्थ्यांसाठी ‘शिक्षण-मित्र’च्या समित्या या जीवनोपयोगी कौशल्य
शिकण्याचे एक मोठे व्यासपीठ ठरल्या. नियोजन, चर्चा, सहमतीने निर्णय, resource
mobilization, negotiation, confrontation, समस्यांवर मार्ग शोधणे अशा कितीतरी
जीवनकौशल्ये मुले कामाची गरज म्हणून शिकत गेली.
पहाडातल्या मुलांना
समजत नाही, त्यांना डोकं कमी असतं, त्यांना येत नाही ही वाक्य अगदी सहजपणे वारंवार
अनेक शिक्षकांच्या तोंडी ऐकू येतात, किंबहुना ही मुलं कमी बुद्धीमत्तेची, कमी
क्षमता असलेली आहेत असा एक सोयीस्कर समज तयार केला गेला आहे. शाळा-शाळांमधून
आदिवासी मुलांच्यावर तो बिंबवला जातो. त्यातूनच कमकुवत, आत्मविश्वासाचा अभाव
असलेली स्वप्रतिमा तयार होते. पहाडातली मुले काय करू शकतात आणि त्यांच्याकडे
कोणत्या क्षमता आहेत हे ‘शिक्षण-मित्र’च्या माध्यमातून आम्ही, इतरांनी आणि खुद्द
मुलांनीही अनुभवले. ‘कुरूप,
वेडे’ म्हणून
हिणवल्या गेलेल्या या राजहंसांना स्वतःला आणि त्यांना पाहणाऱ्या इतर अनेकांना
त्यांच्या ‘स्व’रूपाचे झालेले दर्शन
आवाक करणारे होते.


सुंदर शब्दात व्यक्त केलेला सुंदर अनुभव. शिक्षणात स्वप्रतिमा (बि)/घडवण्याची ताकद असते हे किती सकारात्मकपणे अधोरेखित झाले आहे..
ReplyDeleteIt is great work by students. It happens because of u .you created the opportunity for that tribal students. Great work
ReplyDeleteधन्यवाद सीमा! खरं आहे तू म्हणतेस ते. शिक्षणात स्वप्रतिमा बिघडवण्याची आणि घडवण्याची प्रचंड ताकद आहे. शाळेत तयार झालेली स्वप्रतिमा बहुधा आयुष्यभर तशीच राहते. पुढे काळाच्या ओघात जीवनानुभवांनी स्वतःचा, स्वतःतील क्षमतांचा शोध लागलाच तरीही शाळेतली स्वप्रतिमा पुसणे कठीण जाते. फार जाणीवपूर्वक कष्ट घ्यावे लागतात त्यासाठी. मी स्वतःही हे अनुभवलेले आहे. त्याचप्रमाणे या वयात लागलेल्या सवयी, संस्कारही. म्हणूनच आपल्या शाळांची जबाबदारी फार मोठी आहे. आपण माणूस म्हणून, नागरीक म्हणून मुलांना नेमके कसे घडवतो हा विचार सतत शाळेच्या पर्यायाने शिक्षकांच्या ध्यानी-मनी असायला पाहिजे.
ReplyDeleteप्रतिसादासाठी धन्यवाद, हुलगे सर! संधी आणि space निर्माण केली की मुलांमधल्या क्षमता उभरून येतात हेच दिसलं या अनुभवातून. हे टीमवर्क होतं आणि तुम्हीही त्याचा भाग होता. तुमच्यासारखे sincere, dedicated आणि संवेदनशील शिक्षक होते म्हणून 'शिक्षणमित्र'चं काम उभं राहू शकलं. निराश करणाऱ्या वातावरणात राहून स्वतःमधली सकारात्मकता टिकवून ठेवणारे तुमच्यासारखे शिक्षक आश्रमशाळांमधे आहेत. मुलांसाठी ते आधार आहेत. त्यांना चांगलं काम करायला दिशा व वाव मिळायला हवा.
ReplyDeleteExcellent documentation and sharing the experiences
ReplyDeleteExcellent documentation and sharing the experiences
ReplyDeleteThank you Patil Sir! You were one of the key stakeholders of this process. So feedback from you matters a lot!
ReplyDeleteNeelakshee says;
ReplyDeleteNice blog with perfect title.
योग्य वेळी योग्य संधी उपलब्ध करून देणारेही भेटावे लागतात तर असे राजहंस नक्कीच घडतात. अशा संधी उपलब्ध करून देण्याऱ्या आणि त्यासाठी अपार कष्ट, प्रयत्न करणाऱ्या शिक्षणमित्र कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा!!!