Sunday, December 13, 2015

विक्रम आणि वेताळ – भाग ३



पुन्हा एकदा राजा विक्रमाने वेताळाला शोधले. झाडावर लटकणाऱ्या वेताळाला खांद्यावर घेऊन विक्रम मार्गक्रमणा करू लागला - मुक्कामी कधीच  पोहोचणारा एक निरंतर प्रवास.
    वेताळाने गडगडाटी हास्य केले. "अखेर तू पुन्हा आलास. तू ऐकणार नाहीस. असो, निदान तुझं चालणं सुकर व्हावं म्हणून मी एक गोष्टं सांगतो. ऐक." असे म्हणून वेताळ गोष्टं सांगू लागला

एक आटपाट नगर होत. नगराचे सम्राट महत्वाकांक्षी व कर्तृत्ववान होते. आपल्या पराक्रमावर, नेतृत्वावर आणि निर्णयशक्तीवर त्यांचा अफाट विश्वास होता. सारे काही आलबेल वाटत असतानाच नगराचा आरोग्य अहवाल प्रकाशित झाला. त्यात नागरिकांचे आरोग्य अतिशयच खालावल्याचे प्रकाशात आले. सम्राट यामुळे अत्यंत व्यथित झाले. नागरिकांना आरोग्य उपचार करणारे वैद्य, त्यांना वैद्यकशास्त्र शिकवणारे वैद्यगुरु, वैद्यांना आवश्यक संसाधने पुरविणारे आरोग्य अधिकारी हे सर्वच या परिस्थितीला जबाबदार असल्याचे लक्षात आले. नागरिकांचे आरोग्य सुधारलेच पाहिजे असा ध्यास सम्राटांनी घेतला. त्यांनी जाहीर केले की या वर्षाखेरीस राज्यातील सर्वच्या सर्व नागरिक हे रोगमुक्त असलेच पाहिजेत आणि त्यानंतर राज्यात कधीही एकही रुग्ण आढळता कामा नये. 

सर्व राज्यभर नागरिकांचे आरोग्य परीक्षण करण्याचे आदेश सुटले. राज्यातील रुग्णांची तसेच त्यांच्या नेमक्या रोगलक्षणांची नोंद करून घेण्याची फर्माने सुटली. राजसेवेतील गावोगावचे वैद्य याकामी लागले. रोगलक्षणांनुसार रोग्यांना आरोग्य उपचार कसे पुरवावे यासाठी नियोजने सुरु झाली. 
याच दरम्यान सम्राटांना त्यांच्याच राज्यातल्या एका वैद्यांधिपतींचा शोध लागला – अनन्य नावाच्या  एका छोट्याशा नगराचे वैद्याधिपती प्रभाकरशास्त्री. प्रभाकरशास्त्रींनी जवळजवळ एक तप निरंतर अभ्यास करून त्यांच्या नगरातील नागरिकांच्या आरोग्यसमस्या, त्यांची मूळ कारणे अभ्यासली. अनेक वनस्पतींवर प्रयोग करून रोगलक्षणांनुसार वापरण्याची निरनिराळी मिश्रणे तयार केली. आरोग्य ही शरीर-मनाची संयुक्त अवस्था आहे हे लक्षात घेऊन चूर्ण, काढे, लेप याबरोबरच योग व ध्यान यातून मानसिक आरोग्याचेही संवर्धन होईल याकडे लक्ष दिले होते. लोकांच्या आरोग्यसवयी तसेच कुटुंब व समाजस्वस्थ्याचाही विचार करून त्यासाठी लोकप्रबोधनाचा प्रयत्न चालविलेला होता. परिसराचा शरीर व मानसिक स्वास्थ्याशी असलेला संबंध लक्षात घेऊन सर्वांच्या सहभागातून नगराचा परिसर स्वच्छ, निरोगी व प्रसन्न राखला होता. विशेषतः आरोग्यधामाचा परिसर तर वृक्षांच्या हिरवाईने, आरोग्य संदेशांच्या रंगबिरंगी चित्रांनी व लिखाणाने सजलेला होता. नगरातील वैद्यांची आरोग्यसमज परिपूर्ण व्हावी आणि नागरिकांच्या प्रती त्यांची बांधिलकी वाढावी यासाठी प्रभाकरशास्त्रींनी सातत्याने विशेष कष्ट घेतले होते. म्हणूनच राज्याची आरोग्य पातळी खालावलेली असताना प्रभाकरशास्त्रींच्या नगरातील नागरिकांचे आरोग्यमान मात्र लक्षणीयरित्या चांगले होते. 

ही गोष्ट सम्राटांच्या लक्षात येताच त्यांनी जातीने या नगराला भेट देऊन प्रभाकरशास्त्रींनी विकसित केलेली आरोग्यसेवेची पद्धती समजावून घेतली. राजधानीत येताक्षणी त्यांनी फर्मान काढले – सर्व नगरांची आरोग्य व्यवस्था अनन्यच्या धर्तीवर असावी. राजसेवेतील प्रमुख वैद्यांना व आरोग्य अधिकाऱ्यांना त्यांनी प्रभाकरशास्त्रींच्या अनन्य नगरात भेटीसाठी पाठविले. सर्वच जण या भेटीनंतर प्रभावित झाले. सर्व राज्यातील आरोग्यव्यवस्था अनन्यप्रमाणे करायची असेल आणि तेही एका वर्षात तर काय करावे लागेल यावर विचारमंथन सुरु झाले. अभ्यास पथकातील अनेक जण रंगीबेरंगी, सुशोभित, प्रसन्न परिसरामुळे प्रभावित झाले होते. अशा परिसरामुळे नागरिकांमध्ये निरोगी राहण्याची प्रेरणा उत्पन्न होते असे त्यांचे मत पडले. काहींनी सुचवले, प्रभाकरशास्त्रींनी विकसित केलेली चूर्णे, काढे व लेप यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून त्यांची राज्यातर्फे विक्री करावी. पथकातल्या काहीजणांनी मात्र शारीर आरोग्याच्या पलीकडे जाऊन मानसिक आरोग्यावर झालेल्या कामाची दखल घेतलेली होती. त्यांच्यामते चक्रासन हे फारच प्रभावी आसन होते. अतीरुग्ण व निरोगी नागरिकांनी एकत्र येऊन चक्राकार बैठक व्यवस्थेमध्ये बसून एकत्र बसून केलेले आसन म्हणजे चक्रासन. यामध्ये निरोगी नागरिकांच्या उच्छ्वासांचा फायदा रुग्ण नागरिकांना होऊन त्यांचे आरोग्य झपाट्याने सुधारण्यास मदत होते असे निरीक्षकांचे मत पडले. 

अनन्य नगराप्रमाणे आरोग्यव्यवस्था करण्यासाठी नक्कल करायच्या गोष्टींची यादी तयार होऊ लागली. सम्राट आपल्या आरोग्यापथकातील वैद्य व अधिकाऱ्यांवर प्रसन्न झाले. अपवाद राजवैद्यांचा. अनन्यमधील आरोग्यव्यवस्थेचे चित्र समग्रपणे पाहण्याऐवजी असे तुकड्या-तुकड्यात पाहणे त्यांना अमान्य होते. शिवाय अनन्य नगरातील पद्धती जशाच्या तशा इतरत्र लागू कारणे हितावह नाही असेही त्यांचे मत होते कारण प्रत्येक ठिकाणाची परिस्थिती, आरोग्य समस्या, त्यांची मूळ कारणे ही वेगवेगळी असू शकतील आणि त्याप्रमाणे आरोग्य उपायांची योजनाही त्याप्रमाणे बदलेल अशी त्यांची ठाम धारणा होती. त्यांच्या मते यापेक्षा प्रभाकर शास्त्रींनी त्यांच्या नगरच्या आरोग्यस्थितीचा अभ्यास कसा केला आणि त्यातून अनुमानाप्रत येऊन सर्वांच्या सहभागाने परिस्थितीनुरूप आरोग्ययोजना कशी तयार केली याचा अधिक अभ्यास होणे गरजेचे आहे. हे एका वर्षात साध्य होण्यासारखे नक्कीच नव्हते

लवकरच राजवैद्यांना आपल्या पदावरून पायउतार व्हावे लागले. 

त्यांच्या जागी नवीन राजवैद्य आले. यांच्याकडे एक महत्वाची क्षमता होती – स्वतःचे वैद्यकशास्त्राचे  ज्ञान, अनुभव, स्वतंत्र बुद्धिमत्ता यापैकी कशाचाच वापर न करता, सम्राटांच्या प्रत्येक आदेशाला, विचारला शिरोधार्य मानण्याची क्षमता! 

अनन्य नगराची ही कीर्ती कानी पडताच इतर काही नगरातले वैद्य, वैद्याधिपती, आरोग्याधिकारी तेथे जाऊन भेटी देऊन आले. अशा भेटी देणाऱ्यांची सम्राट व इतर अधिकाऱ्यांकडून विशेष प्रशंसा होऊ लागली. हे लक्षात येताच सर्वच नगरातील वैद्य, वैद्याधिपती, आरोग्याधिकारी यांच्या भेटींचा ओघ अनन्यला चालू झाला. कोणा कामचोर वा निर्बुद्ध वा विपरीत मती वैद्य, वैद्याधिपती, आरोग्याधिकारी यांनी या भेटी टाळू नयेत यासाठी अलिखित आदेश निघू लागले. अनन्यमधील वैद्य, वैद्याधिपती, आरोग्याधिकारी आणि खुद्द प्रभाकरशास्त्री यांना श्वास घ्यायलाही फुरसत मिळेना. प्रभाकर शास्त्रींना त्यांचे संशोधन, वैद्य व रुग्ण यांच्याबरोबरचा संवाद यासाठी वेळ मिळेनासा झाला. 
जिकडे तिकडे आरोग्यधामांची दालने रंगू-सजू लागली. सर्वत्र चक्रासने सुरु झाली. प्रभाकरशास्त्रींच्या औषधींचा खप सुरु झाला. नागरिकांचे आरोग्यमान महिन्या-दोन महिन्यातच सुधारत असल्याच्या नव्हे अमूलाग्रपणे बदलत असल्याच्या घोषणांचा पाऊस सुरु झाला. सम्राट प्रसन्न, प्रसन्न, प्रसन्न होऊ लागले. 

अशा वातावरणातच अचानक काही विशेष घडू लागले. अनेक नगरातील लोकांच्या डोळ्यांत, त्वचेवर पिवळी छटा दिसू लागली. अन्नावरची वासना उडाली. अंग तापू लागले. याच सुमारास राज्यातील आरोग्य मोहिमेची कीर्ती ऐकून शेजारील राज्यातील एक तरुण, उत्साही, होतकरू वैद्य मोठ्या आशेने या राज्यात अभ्यासासाठी आला. अनेक नगरांमधून तो फिरला, अनन्यमधेही गेला. तेथील चित्र पाहून त्याच्या मनात प्रश्नांचे काहूर उठले. पण घोषणांच्या गदारोळात त्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरे मिळेनात म्हणून अखेर तो राजधानीत आला. 

राजदरबारात प्रवेश करतानाच त्याच्या कानावर सम्राटांचा प्रश्न पडला, ‘राजवैद्य, कशी आहे आमच्या राज्याची आरोग्यस्थिती?’ राज वैद्यांचे कथन पाहुणा तरुण वैद्य मोठ्या कुतूहलाने ऐकू लागला. ‘सम्राट, राज्याची आरोग्य स्थिती अगदी उत्तम आहे. आरोग्य ज्ञानाची पिवळी धम्मक प्रभा अनेकांच्या डोळ्यातून फाकते आहे. नागरिकांनी आरोग्याची सर्वोच्च पायरी गाठल्याने त्यांची कांती सुवर्णाप्रमाणे झळाळते आहे. आत्मज्ञानाच्या रसपानात आकंठ बुडाल्याने ऐहिक अन्नाचीही गरज त्यांना भासेनाशी झाली आहे. काही जणांचे आत्मबल तर इतक्या अत्त्युच्च पातळीला पोचले आहे की त्या जोरावर त्यांच्या पाठीवर संत ज्ञानेश्वरांप्रमाणे पोळ्या भाजल्या जाऊ शकतात. ऐहिक आयुष्यातील शारीर-मानस स्वास्थ्याच्या सर्व पायऱ्या इतक्या झपाट्याने गाठल्यामुळे अनेकजण लगोलग मोक्षाप्रतही जाऊ लागले आहेत.....’

पाहुणा तरुण वैद्य पुढील विवेचन ऐकायला न थांबता, आपले प्रश्न न विचारता आल्या पावली माघारी फिरला व आपल्या राज्याच्या दिशेने चालता झाला.
वेताळाची गोष्टं संपली. विक्रम भानावर येतोय तोच वेताळाचा आवाज कानात शिरला, "विक्रमा आता मी जे प्रश्न विचारणार आहे त्याची उत्तरं माहित असूनही तू नाही दिलीस तर तुझ्या मस्तकाची हजार शकलं होऊन तुझ्याच पायाशी लोळू लागतील. आणि उत्तर दिलंस तर मी माझ्या जागी परत जाणार. हाs हाs हाs.     सांग, तरुण वैद्य स्वतःचे प्रश्न न विचारताच का माघारी फिरला?.........’’

No comments:

Post a Comment