मुलांचे जग हा एकूणच
आपल्याकडे दुर्लक्षित विषय. मुलांसाठीचं साहित्य बघितलं तरी ते ठळकपणे जाणवतं.
लंपनच्या गोष्टींतून प्रकाश संतांनी मांडलेलं किशोरवयीन मुलांचं भावविश्व किंवा
माधुरी पुरंदऱ्यांनी यश, केतकी, तनू यांच्या माध्यमातून मांडलेलं वय पर्षे ५ ते १२
चं भावविश्व – हे सन्माननीय अपवाद, तेही शहरी, मध्यमवर्गीय मुलांचं भावविश्व
मांडणारे.
या पार्श्वभूमीवर
मुळातच उपेक्षित असणाऱ्या आदिवासी मुलांचे भावविश्व खिजगणतीतच नसणे स्वाभाविकच
आहे. ‘शिक्षण-मित्र’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदिवासी आश्रमशाळांमधल्या
मुलांबरोबर काम करायला सुरुवात करतानाच या मुलांचे भावविश्व काय असेल, कसे पाहत
असतील ती जगाकडे याबद्दलची उत्सुकता मनात होतीच. त्यामुळेच मुलांना व्यक्त
होण्यासाठी एक अवकाश मिळावा, एक व्यासपीठ मिळावे यासाठी एका त्रैमासिक
भित्तीपत्रकाची आखणी केली. नावासाठी मुलांकडूनच सूचना मागवल्या आणि आलेल्या
सुचांनामधूनच नाव निवडले - ‘बालखाजिना’.
पण बालखजिना सुरु
झाला तरी त्याचा खरा उद्देश साध्य होईपर्यंत खूपच झगडावे लागले, कारण मनातले
विचार, कल्पना, भावना व्यक्त करण्यासाठी लेखन किंवा चित्रकला असा विचारच
दुर्दैवाने आपल्या शाळांमधे नाहीये. त्यामुळे जास्तीत जास्त माहितीने भरलेले, उसन्या
कल्पना आणि उपमा-उत्प्रेक्षा वगैरे भाषेच्या फुलोऱ्याने सजलेले निबंध आणि नकलून
काढलेली किंवा चित्रकलेच्या नियमांनी बांधलेली चित्रे यांनी भरलेले बालखजिने
आमच्या हाती येऊ लागले. जवळपास ४ वर्ष शिक्षक आणि आमच्याही कार्यकर्त्यांशी सतत
संवाद केल्यानंतर रूढ चौकटीतले निबंध आणि चाकोरीबद्ध चित्रे यांतून हळूहळू शिक्षक-कार्यकर्ते
बाहेर येऊ धजू लागले. काही ठिकाणी तर मुले बालखजिन्यावर काम करत असताना शिक्षकांना
वर्गात प्रवेश बंद असाही नियम अमलांत आणून पहिला. आमच्या या मुलांना शब्दांपेक्षा
चित्रांतून व्यक्त व्हायला जास्त आवडते असा अनुभव आला. या बालखजिन्यातून जी चित्रे
आमच्या हाती लागली तो एक अमूल्य ठेवा होता. या मुलांचे जग, त्यांचा त्याकडे
पाहण्याचा दृष्टीकोन, त्यांची विचारप्रक्रिया, त्यातून त्यांनी करून दिलेली
आदिवासी संस्कृतीची ओळख आणि या सर्वांतून प्रकट झालेले त्यांच्या बुद्धिमत्तेचे
पैलू अशा कितीतरी गोष्टींचा पट ही चित्रे आहेत. काही निवडक चित्रांतून तुमच्यासमोर
तो मांडण्याचा प्रयत्न या लेखामध्ये केलेला आहे.
सर्वात पहिल्यांदा या चित्रांचे वैशिष्ट्य
सांगायला हवे, ते म्हणजे ही चित्रे कुणा एकट्या मुलाने वा मुलीने काढलेली नसून ही
सामुहिक चित्रे आहेत. आदिवासी संस्कृतीच्या सामुहिक जगण्याचे प्रतिबिंब या
चित्रकलेमध्येही दिसते.
गावाचे हे चित्र पहाताक्षणीच आपल्याला गावाची आणि
परिसराची कल्पना येते. आदिवासी पाडे अनेकदा विखुरलेले असतात. या चित्रातही
रस्त्याच्या अलीकडे आणि पलीकडे घरे विखरून असलेली आपल्याला दिसताहेत. नीटनेटके
वाफे आणि भिंतीवरच्या सर्व शिक्षा अभियानाच्या पाटीसकट दिसणारी आणि तुलनेने मोठ्या
आकारात काढलेली शाळा मुलांच्या मनातले तिचे स्थान सांगून जाते.
नदीवर बांधलेला पूल
आणि त्यावरून धावणाऱ्या मोटारी, तसेच डोंगरावरच्या पवन चक्क्यांचे पंखे हे गावात
पोचत असलेल्या आधुनिक जगाच्या खुणा दाखवत आहेत. पलीकडच्या बाजूला विहिरीतून आणि
हापशातून पाणी शेंदणाऱ्या स्त्रिया हे गावातले वास्तव आहे.
चित्रातले बारकावे पहिले तर आपण थक्क होतो. गावाचे
वातावरण उभे करणाऱ्या कोणकोणत्या गोष्टी या चित्रात दिसताहेत तुम्हीच शोधा.
हे आणखी एक चित्र त्यातल्या तपशिलांच्या
बारकाव्याने आपल्याला अचंबित करते. गावदिवाळी हा नंदुरबारच्या आदिवासी भागातला
आपल्या नेहमीच्या दिवाळीनंतर साजरा केला जाणारा सण. रात्री सोंगाड्या पार्टीचा खेळ
हे या सणाचे मोठे आकर्षण. या चित्रात सोंगाड्या पार्टीच्या खेळाला जमलेला गाव
आपल्याला दिसतो आहे. पाठमोऱ्या बसलेल्या गावकऱ्यांमधील एकही दुसऱ्यासारखा नाही ही
लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. फुगेवाल्याच्या पलीकडे एक घोळका एका आयताकृती
बोर्डाभोवती गोल करून बसलेला दिसतो. ती आहेत पत्त्यांवर जुगार खेळणारी मंडळी.
आजूबाजूला घडणाऱ्या सर्व बऱ्या-वाईट गोष्टी मुले बारकाईने टिपत असतात, नोंदवत
असतात. सोंगाड्या पार्टीच्या चित्रात प्राणी जगताची अनुपस्थिती विशेष लक्षात येते.
माणसांनी रात्र जगावयाचे ठरवले असले तरी बाकी प्राणी नैसर्गिक दिनक्रम पाळत आहेत
याचे हे द्योतक आहे.
धडगावच्या बाजाराचे हे चित्र समांतर
तसेच एकमेकांना छेदून असणाऱ्या वेगवेगळ्या रस्त्यांवर भरलेल्या बाजाराचे समग्र
दर्शन आपल्याला घडवते. यातले अनंत तपशीलही लक्षात घेण्याजोगे आहेत. पहिल्याच
दुकानात गुटख्याची पाकिटे लोंबताना दिसत आहेत. कायद्याने गुटखा विकायला बंदी असली
तरी गावात तो राजरोस विकला जातो या वास्तवाचे प्रतिबिंब या चित्रात दिसते आहे.
बाजाराचे सर्व रस्ते वाहनांनी भरून वाहताना दिसतात. बाजाराचा दिवस असल्यामुळे
असणारी गर्दी तर आहेच पण धडगाव हे तालुक्याचे गाव असल्याने अन्य ठिकाणापेक्षा
इथल्या रस्त्यांवर खरंच वाहनांची गर्दी जास्त असते. शोधा बरं बाजारात आणखी कशाकशाची
दुकाने आहेत आणि परिसराचे कोणते तपशील आलेले आहेत?
आपण ही सर्व चित्रे
नीट पहिली तर लक्षात येईल की वरून बघितल्यावर जे दृष्य दिसेल त्याप्रमाणे काढलेली
(Top View) चित्रे आहेत. सातपुडा पर्वतात राहणाऱ्या या मुलांना जग उंचावरून बघायची
सवय आहे याची साक्षच ही चित्रे देते. तसेच या मुलांच्या दृष्टीचा मोठा आवाकाही
यातून दिसतो.
आजूबाजूचा परिसर,
निसर्ग हा मुलांच्या भावविश्वाचा एक अविभाज्य भाग आहे हेही प्रत्येक चित्राच्या
फ्रेममधून जाणवते.
एकीकडे अत्यंत तपशीलवार चित्रण करणारी चित्रे
काढणारी ही मुले मोजक्याच रेषांमध्ये विषयाची नेमकी आणि अर्थगर्भ मांडणीसुद्धा कशी
करू शकतात हे पुढच्या चित्रामध्ये दिसेल.
इथेही बाजार याच विषयावरची मांडणी आहे पण
शहरातल्या आणि गावातल्या बाजारातला फरक फार थोड्या पण नेमक्या तपशिलांमधून दाखवला
आहे. उंच इमारत, डांबरी सडक, झेब्रा क्रॉसिंग यांतून शहराचे चित्रण होते.
काचेआडच्या दुकानात प्रदशनार्थ टांगलेले कपडे आणि पुतळा, शेजारचे धान्य साठवणीचे
गोदाम आणि आधुनिक वेशभूषा केलेले हातात कॅरी bag घेऊन निघालेले कुटुंब यातून
शहरातल्या बाजाराचे यथार्थ चित्रण केलेले आहे. या पार्श्वभूमीवर खालच्या बाजूला
गावातला बाजार दिसतो. मातीची जमीन. विक्रेते जमिनीवरच मांड ठोकून बसलेले. आणि
मुख्य म्हणजे विक्रीला असलेल्या सर्व वस्तू जीवनावश्यक म्हणाव्यात अशा. त्यांचे
प्रमाणही थोडकेच. शहरासारखे अवाढव्य नाही. गाव आणि शहर येथील सांस्कृतिक फरकावर
भाष्य करणारे हे चित्र आहे. मुलांनी इतक्या जाणीवपूर्वक भाष्य करण्यासाठी ते
अर्थातच काढलेले नाही पण त्यांच्या नेमक्या निरीक्षणांनी आपोआप नकळत हे भाष्य
घडलेले आहे.
मात्र इथल्या साध्या, निसर्गाशी तादात्म्य
पावणाऱ्या संस्कृतीवरही हळूहळू शहराचा प्रभाव पडत आहे. पुढील चित्र लग्न समारंभाचे
आहे. इलेक्ट्रिकल बेंजो वाजवणाऱ्याला पारंपारिक ताशा वाजवणारा कलाकार साथ देत आहे.
आधुनिक वेशभूषा केलेली तरुण मुले-मुली संगीताच्या तालावर पारंपारिक आदिवासी नृत्य
करताना दिसत आहेत. त्यातच स्कर्ट-ब्लाउझ घातलेली करवली डोक्यावर ‘शिबली’ घेऊन नाचताना
दिसते आहे. भिल-पावरा जमातींच्या लग्नांमध्ये ‘शिबली’चे म्हणजे विशिष्ट पद्धतीने सजवलेल्या
या टोपलीचे विशेष सांस्कृतिक महत्व आहे. जुन्या-नव्याची अशी सरमिसळ या चित्रातून
व्यक्त होते आहे.
मुलांनी काढलेल्या या चित्रांचे आणखी एक मोठे महत्व म्हणजे आदिवासी संस्कृतीचे उत्तम दस्तऐवज म्हणूनही त्यांची क्षमता आहे. पावरा समाजात साजरा केल्या जाणाऱ्या ‘इंदल’ या सणाचे हे चित्र. मानता म्हणजेच नवस पूर्ण करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. या पूजेसाठी ‘कोंबा’ किंवा ‘कुम्बन’ या झाडाच्या ३ फांद्या लागतात. या फांद्या एखाद्या लहान मुलानेच तोडाव्या असा रिवाज आहे. या फांद्यांची पूजा करून गायन-वादन-नृत्य करून रात्र जागवतात. बोकडाचा बळी देतात. सकाळी या फांद्याचे नदीत विसर्जन करतात. इंदल या सणातले हे ३ मुख्य विधी या चित्रात आपल्याला दिसत आहेत.
मुलांनी काढलेल्या या चित्रांचे आणखी एक मोठे महत्व म्हणजे आदिवासी संस्कृतीचे उत्तम दस्तऐवज म्हणूनही त्यांची क्षमता आहे. पावरा समाजात साजरा केल्या जाणाऱ्या ‘इंदल’ या सणाचे हे चित्र. मानता म्हणजेच नवस पूर्ण करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. या पूजेसाठी ‘कोंबा’ किंवा ‘कुम्बन’ या झाडाच्या ३ फांद्या लागतात. या फांद्या एखाद्या लहान मुलानेच तोडाव्या असा रिवाज आहे. या फांद्यांची पूजा करून गायन-वादन-नृत्य करून रात्र जागवतात. बोकडाचा बळी देतात. सकाळी या फांद्याचे नदीत विसर्जन करतात. इंदल या सणातले हे ३ मुख्य विधी या चित्रात आपल्याला दिसत आहेत.
पुजेच्या विधीत सहभागी असणाऱ्या या माणसांना
‘वळवा’, ‘बळवा’ आणि ‘फुवाण्या’ असे संबोधले जाते. सर्व माणसांनी दाढी-मिशा
वाढवलेल्या दिसत आहे. याचा संबध आणखी एका प्रथेशी आहे. पूजाविधीत सहभागी होणाऱ्या
पुरुषांना आधीचे १५ दिवस काही व्रतांचे पालन करावे लागते: - पलंगावर झोपायचे नाही,
घरी शिजवलेले खायचे नाही, मासांहार करायचा नाही, पायात पायताण घालायचे नाही,
श्मश्रू करायची नाही अशा अनेक व्रतांचे पालन करून हे पुरुष पूजाविधीसाठी सिद्ध
होतात.
आदिवासी
लग्नसंस्कृतीचे व प्रथांचे वैशिष्ट्य दाखवणारे हे एक चित्र. चित्रातील डावीकडील
जोडपे त्यांच्या विचित्र दिसण्यामुळे विशेष लक्ष वेधून घेते आहे. उजवीकडच्या तरुण,
उत्फुल्ल जोडप्यापेक्षा डावीकडील जोडपे वयस्कर दिसत आहे. पण चित्रकारांचे कौशल्य
उणे पडल्यामुळे किंवा चुकीमुळे ते जोडपे तसे दिसत नसून, चित्रकारांना जाणीवपूर्वक
ते जोडपे प्रौढ दाखवायचे आहे. आदिवासी समाजात मुलाने व मुलीने पळून जाऊन लग्न न
करताच एकत्र राहायला, संसार करायला सुरुवात केली तर समाज त्यांना स्वीकारतो पण
जेंव्हा त्यांच्या मुलांचे लग्न लावायची वेळ येते तेंव्हा आधी आई-वडिलांचे लग्न
लावावे लागते. मगच मुलांचे लग्न लावता येते. त्यामुळे एकाच मांडवात आधी आई-
वडिलांचे आणि नंतर मुलाचे वा मुलीचे अशी दोन लग्ने लागतात.
या सर्व चित्रांतून
मुलांचे भावविश्वात डोकावण्याची संधी मिळाली. भित्तीपत्रकाच्या निमित्ताने आणि नंतर Grass-root Cinema च्या निमित्ताने त्यांच्यातील काही विशेष क्षमतांचाही परिचय झाला त्याविषयी पुढच्या लेखात.
(मिळून साऱ्याजणीच्या जुलै १७ या अंकात पूर्वप्रकाशित)







wonderful. Psychological perspective of a culture can be captured through natural children's expression.
ReplyDeleteसुजलाताई तुम्ही म्हणता ते खरं आहे. चित्रांच्या माध्यमातून उलगडणारं मुलांचे विशेषतः आदिवासी मुलांचं भावविश्व हा खरोखरीच अभ्यासाचाच विषय आहे. या विषयातला सखोल अभ्यास करावा अशी इच्छा आहे खरं तर.
ReplyDeleteपाटील सर धन्यवाद! छान वाटतं की तुम्ही सर्व पोस्टस् आवर्जून वाचता आणि प्रतिक्रीया देता.
ReplyDeleteखूपच छान लेख. काही वर्षांपूर्वी पुण्यात चित्रबोध नावाचा एक workshop झाला होता. त्यातही शहराबाहेरील मुलांनी काढलेल्या चित्रांत काय आहे हे सांगताना या प्रकारची मांडणी होती. खूप मोठं काम करताय. आभार!
ReplyDelete