२००३ साली बायफच्या महाराष्ट्रातील
सह-संस्थेने ‘मित्र’ने ५०,००० अल्पभूधारक आदिवासी
कुटुंबांबरोबर एक महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला होता. छोट्या जमिनीत, कमी
भांडवलात शेती फायद्याची कशी करावी याचे वेगवेगळे तंत्रज्ञान, याबरोबरच कुटुंबाचे
आरोग्य शिक्षण, महिला सक्षमीकरण असा बहुआयामी कार्यक्रम होता तो. त्यात प्रथमच
बायफने या कार्यक्रमाच्या कार्यक्षेत्रातील ५० आश्रमशाळांबरोबर काम सुरू केले
होते. एका आश्रमशाळेत ३०० ते ४०० मुले असतात. तेथे शेतीविषयक तंत्रज्ञानाचे तसेच
आरोग्य विषयक गोष्टींचे demonstration केले तर ते सहज त्या मुलांच्या
आई-वडिलांपर्यंत म्हणजे ६०० ते ८०० पालकांपर्यंत पोहचेल असा विचार त्यामागे होता.
सुरूवातीला तंत्रशुद्ध फळबाग लागवड,
परसबाग, पाणी शुद्धीकरण यंत्राची तसेच स्वस्त संडासांची, रेन वॉटर हार्वेस्टींग
युनिटची उभारणी अशी काही कामे झाली पण ती टिकेनात. अतिशय दुर्गम गावात
पोहोचणाऱ्या, गावातल्या नाना तऱ्हेच्या, प्रसंगी टारगट लोकांनाही सहज
हाताळणाऱ्या, गावातले ताणे-बाणेसमजून घेऊन, आणि स्थानिक राजकारणाला फाटा देऊन
विकासाच्या कामात सर्वांना सहभागी करून घेण्याचं आव्हान पेलणाऱ्या आणि यशस्वी करुन
दाखवलेल्या बायफच्या कर्मचाऱ्यांना शाळेतले काम अवघड वाटू लागले कारण स्वतःच्या
प्रगतीची, अर्थिक उन्नतीची जी स्वाभाविक प्रेरणा शेतकऱ्याला असे, ती
शाळांना नव्हतीच. सामुहिक जबाबदारी सहसा कोणाचीच नसते या न्यायाने शाळेतील
कार्यक्रमाची ओनरशिप कोणीच घ्यायला तयार होईना. शिवाय बाहेरचे कोणी शाळेत न येणेच
अनेक शाळांना ‘झाकली मूठ’ या न्यायाने
सोयीचे होते.
एकीकडे बायफचे कर्मचारी असे हताश
झालेले असताना ‘मित्र’चे अध्यक्ष व बायफचे उपाध्यक्ष (व्हाईस
प्रेसिडेंट) श्री सोहनी यांना मात्र या कार्यक्रमाची ताकद,
त्याचे पोटेन्शिअल दिसत होते. बायफचे संस्थापक डॉ. मणिभाई देसाई हे गांधीजींचे
शिष्य. त्यामुळे बायफचा गांधी विचारांशी धागा जोडलेला होता. आश्रमशाळांमधील काम
नयी तालिम शिक्षण-पद्धतीशी जोडता येईल हा विश्वास श्री सोहनी यांना वाटत होता.
त्याचवेळी मी त्यांना भेटले.
पडसऱ्यामध्ये शेतीचे प्रकल्प करून त्याला गणित, विज्ञान जोडण्याचा प्रयोग मी
माझ्या सहकाऱ्यांबरोबर केलेला होता. आमची भेट झाल्यावर मला जाणवले की माझ्या
मनातलं काम मला इथं करायला मिळेल. सोहनींनी माझ्यावर आश्रमशाळांमधल्या
कार्यक्रमाचे प्रारूप तयार करण्याची जबाबदारी सोपवली.
तीन महिन्यांनंतर कार्यक्रमाची रचना
तयार झाली आणि कार्यक्रमाचे नावही निश्चित झाले –‘शिक्षण-मित्र’.
आधीच्या आखणीप्रमाणे आताही आम्ही शेतीचे प्रकल्प करणारच होतो आणि आरोग्य प्रकल्पही.
पण त्या जोडीला आरोग्य शिक्षण, जन्म-मृत्यू दाखल्यासारख्या महत्वाच्या
कागदपत्रांची ओळख, नागरी संस्थांची ओळख यांतून सजग, सुजाण व जबाबदार नागरिक होण्यासाठी
मदत करणाऱ्या उपक्रमांची भर घातली होती. उपक्रमांतून मुलांचे शिक्षण होईल
यापद्धतीने कार्यक्रमाची रचना जाणीवपूर्वक केलेली होती.
आम्ही ‘शिक्षण-मित्र’ची सुरूवात करतानाच २ महत्त्वाची तत्वं
ठरवून घेतली होती:
१) शाळेला विश्वासात घेऊन कामाची उभारणी – शिक्षकांच्या
मनात अनेक शंका, भीती वगैरे भावना होत्या. वरुन अचानक लादल्या जाणाऱ्या शासकीय
कार्यक्रमांना शिक्षक कंटाळलेले होते. आम्ही शिक्षकांना हा विश्वास दिला की
त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कार्यक्रमामधले निर्णय होणार नाहीत.
२) मुलांचा सहभाग – हा कार्यक्रमातला सर्वात महत्वाचा व कळीचा मुद्दा होता.
नियोजनापासून ते कार्यक्रमाच्या मूल्यमापनापर्यंत सर्व टप्प्यांवर मुलांच्या
सक्रीय सहभागासाठी समितीची रचना बसवलेली होती.
हळू-हळू शाळा-शाळांमध्ये परसबागा उभ्या
राहिल्या. कोणत्या हंगामात कोणत्या भाज्या लावाव्या, त्यासाठी वाफे कसे तयार
करावे, जमिनीची मशागत कशी करावी, चांगल्या बियाण्याची पारख कशी करावी, त्याची
रुजवण चांगली होण्यासाठी कोणत्या सेंद्रीय प्रक्रीया त्यावर कराव्या, सेंद्रीय खत
व कीटक नियंत्रके स्वतःच तयार करुन रोपांच्या वाढीसाठी त्यांचा वापर कसा करावा अशा
विविध गोष्टी मुले शिकली. याच पद्धतीने तंत्रशुद्ध फुलशेती आणि फळशेतीदेखील ती
शिकली. पण निव्वळ शेती विषयक ज्ञानापलिकडे जाऊन परसबाग आखताना क्षेत्रफळाचा अभ्यास,
कुंपणाचे नियोजन करताना परिमितीचा अभ्यास असा एरवी पुस्तकात परकेपणाने भेटणारा व
भिववणारा अभ्यास त्यांना शेती प्रकल्पांच्या अंगणात सोपा आणि गंमतीदार होऊन भेटू
लागला. ही कामे करताना त्यांनी जमिनीची लांबी-रूंदी मीटरमध्ये मोजली, कीटकनाशक
तयार करण्यासाठी अनेक द्रवपदार्थ लीटरमध्ये मोजले,
स्वतः तयार केलेले गांडूळ खत आणि पिकवलेल्या भाज्या-फुलेग्रॅम व किलोमध्ये मोजल्या, भाज्या तयार होण्यासाठीच्या कालावधीची नोंद ठेवली. पाऊसदेखिल सें.मी. मधे मोजला. गणितातल्या परिमाणे या विषयाचा अभ्यास असा नकळत होत गेला. काही जणांना आपल्या शेतात आलेल्या भाज्या, मोगऱ्याची, गुलाबाची फुले, तयार केलेले गांडूळखत यांची विक्री करायची संधीही मिळाली. अशी मुले विक्री कौशल्ये शिकली. पण त्याच वेळी झालेला खर्च व मिळालेले उत्पन्न याचा ताळमेळ त्यांनी लावावा यासाठी आम्ही आग्रह धरला. जमा-खर्च, नफा-तोटा अशा गणिती मंडळींची यांतून भेट घालून देण्याचा प्रयत्न केला. दर आठवड्याच्या/महिन्याच्या भाजी, फुलं किंवा गांडूळखत उत्पादनाचे आलेख मुलांनी काढले.
स्वतः तयार केलेले गांडूळ खत आणि पिकवलेल्या भाज्या-फुलेग्रॅम व किलोमध्ये मोजल्या, भाज्या तयार होण्यासाठीच्या कालावधीची नोंद ठेवली. पाऊसदेखिल सें.मी. मधे मोजला. गणितातल्या परिमाणे या विषयाचा अभ्यास असा नकळत होत गेला. काही जणांना आपल्या शेतात आलेल्या भाज्या, मोगऱ्याची, गुलाबाची फुले, तयार केलेले गांडूळखत यांची विक्री करायची संधीही मिळाली. अशी मुले विक्री कौशल्ये शिकली. पण त्याच वेळी झालेला खर्च व मिळालेले उत्पन्न याचा ताळमेळ त्यांनी लावावा यासाठी आम्ही आग्रह धरला. जमा-खर्च, नफा-तोटा अशा गणिती मंडळींची यांतून भेट घालून देण्याचा प्रयत्न केला. दर आठवड्याच्या/महिन्याच्या भाजी, फुलं किंवा गांडूळखत उत्पादनाचे आलेख मुलांनी काढले.
या प्रकल्पांच्या निमित्ताने विविध
प्रकारच्या नोंदी व लेखन करायलाही आम्ही मुलांना प्रोत्साहन दिले. स्वतःच्या
कामाचे चित्र स्वतःला दिसण्यासाठी नोंदी करायच्या, दुसऱ्या कोणाला दाखवण्यासाठी
नाही हा विचार पुन्हा-पुन्हा शिक्षकांसमोर मांडला. सर्वात महत्वाचे म्हणजे
प्रत्येक नोंदपत्रक हे मुलांच्या शिक्षणाचे माध्यम होते. काटेकोर मोजणी, निरीक्षण,
निरीक्षणाची स्वतःच्या शब्दात मांडणी यासाठी या नोंदींची मदत होणार होती.
शास्त्रीय पद्धतीने आपल्या कृतीच्या परिणामांचे अनुमान आणि निष्कर्ष काढण्यासाठीचा,
जमा-खर्च, नफा-तोटा शिकण्यासाठीचा data या तांत्रिक नोंदीमधून मिळणार होता. अखेर
हळू-हळू मुले स्वतःच्या शब्दांत पण काटेकोरपणे नोंदी व लेखन करतील याकडे लक्ष
पुरवले जाऊ लागले. मुलांनी किती व्यवस्थित नोंदी ठेवल्या याची एक झलक खाली दिसते
आहे:
आम्ही आमच्या शाळेवर दि. १० ऑगस्ट २०१२ रोजी १०
x २० चा प्लॉट तयार केला. त्यात पालापाचोळा टाकून पाण्याने पूर्ण माती
व पाणी डकवून भात पेरणीसाठी प्लॉट तयार केला व त्यात दोन प्रकारचा भात लागवड केला
व आम्हाला श्री. एखंडे सर यांनी पेरणीसाठी रोप आणून दिले. आम्ही १० x २०
चा प्लॉट तयार केला होता त्याचे आम्ही दोन भाग पाडले व एक प्लॉटमध्ये पारंपारिक पद्धतचा
भात लागवड केला व दुसरा प्लॉट मध्ये सदन पद्धतीने लावले. आम्ही भात लावत होतो
तेव्हा भाताची उंची सारखी होती. नंतर पारंपारिक पद्धतीने लावलेल्या भाताची उंची
जमिनीपासून मोजली तर ६० इंच भरली व सदन पद्धतीने लावलेल्या भाताची उंची ४५ भरली.
कारण पारंपारिक पद्धतीने लावलेला भात दाट आला. सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी रोपाला
उंची वाढवावी लागली आणि जास्त शक्ती त्यात खर्च झाली. ओंबीमध्ये सुद्धा फरक होता.
सदन भाताची ओंबी मोठी दिसून आली. पाण्याच्या प्रमाणातसुद्धा फरक आहे व पाणी
देतानासुद्धा पारंपारिकला जास्त पाणी लागत होता व सदन भात लागवडीला कमी पाणी लागत
होता.
अनुदानित आश्रमशाळा, केवडीपाडा, नंदूरबार
प्रक्रीया नोंदींचा दुसरा भाग म्हणजे
केलेल्या कामकाजाच्या वर्णनात्मक नोंदी. आमचा आग्रह नेहमीच मुलांनी स्वतःच्या
भाषेत लिहावे असा असायचा. त्यांनी आदिवासी भाषा वापरण्यालाही आडकाठी नव्हती.
मुलांना स्वतःचे विचार, स्वतःचे म्हणणे दुसऱ्याचे शब्द उसने न घेता स्वतःच्या
शब्दात मांडता येण्याला महत्व होते. या मुद्द्यावरही शिक्षकांबरोबर बरेच काम करावे
लागले. आपल्या शाळांमध्ये भाषेच्या फुलोऱ्याला अवास्तव महत्व दिले जाते, त्यात आशय
हरवला तरी हरकत नाही इतके. त्यामुळे अनेकदा शिक्षक वर्णनात्मक नोंदी dictate
करत. स्वतःचे विचार आणि स्वतःची समज स्वतःच्या
शब्दात सुसंगतपणे लिहिता येणे हा भाषा शिक्षणातला फार मोठा टप्पा आहे हे वारंवार
पटवून दिल्यावर मुलांना स्वतंत्रपणे, स्वतःला हव्या तशा नोंदी करण्याची मुभा
मिळाली.
गांडूळखत समिती
गांडूळखत समिती
१० जून २०१२ ते २५ जुलै २०१२
खड्ड्याची लांबी ९ फूट आणि रुंदी ३ फूट
व उंची १ फूट गांडूळाची जात – इटानीया फोटेडा
सुरुवातीला आम्ही पालापाचोळा, वाळलेले
गवत, इकडून-तिकडून आणलेले शेण खड्ड्यात टाकले. तो कुजून झाल्यावर त्याच्यामध्ये
दीड किलो गांडूळ सोडले. १० जूनला खड्ड्यात पालापाचोळा टाकला आणि ते खत २५ जुलैला
तयार झाले. ५५ किलो खत निघाले. ते खत आम्ही परसबाग, फळबाग, फुलबाग या समित्यांना
दिले. १५ किलो खत परसबागवाल्यांना दिले. १५ किलो खत फळबागवाल्यांना दिले व बाकी
फुलबागवाल्यांना दिले. गांडूळ दीड किलो सोडले होते त्यांचे तीन किलो झाले.
१५
सप्टेंबर २०१२ ते ३० ऑक्टोबर २०१२
किती
किलो निघाले? ४३
किलो निघाले.
१०
किलो फुलबागवाल्यांना दिले. परसबागवाल्यांना १३ किलो दिले. उरले खत वांगी, मेथी
लावण्यासाठी माती भुसभुस व्हायला पाहिजे म्हणून मातीमध्ये टाकले. कुंपण केले होते.
परंतु मुलांनी सगळे कुंपणमधले काडी जाळून टाकले. म्हणून ३ सप्टेंबरला कुंपण केले.
आम्हाला कुंपण करायला खूप अडचण झाली म्हणून आम्ही मुलांची मदत घेतली आणि
नदीकाठच्यासुद्धा काठ्या तोडून आणल्या.
३ नोव्हेंबर २०१२ ते १० जानेवारी २०१३
किती
किलो निघाले? ८०
किलो निघाले.
१० किलो फळबागवाल्यांना दिले. १३ किलो
फुलबागवाल्यांना दिले. १७ किलो परसबागवाल्यांना दिले. ४० किलो आमच्याजवळ आहे. अजून
सर्व मुलांनी काठ्या सर्व काढून जाळून टाकले होते. आम्ही परत कुंपण केले. ५
जानेवारीला कुंपण केले. नंतर सरांना सूचना करायला सांगितले की कुंपण केलेल्या
काठ्या कृपया मुलांनी जाळू नये. जो जाळेल त्याला शिक्षा करण्यात येईल.
अनुदानित
आश्रमशाळा, उमज, नंदूरबार
-
मुलांनी आपल्या अनुभवांवर कविताही रचल्या
आमरी शाळांमा
फुलबाग लगाड्यो रे लगाड्यो
बायहो आमरी समजमांनी आव्यो
जास्वंद बी लगाड्यो बायहो
गुलाब बी लगाड्यो
ओ आमरी शाळांमा
मोगरा लगाड्यो रे लगाड्यो
बायहो आमरी
समजमांनी आव्यो
पालक बी लगाड्य बायहो
कथंबीर बी लगाडी
ओ आमरी शाळांमा
मेथी आवी रे आवी
बायहो आमरी
समजमांनी आव्यो
वांगा बी लगाड्या बायहो
धुडको बी लगाड्या
ओ आमरी शाळांमा
भेंडी आवी रे आवी
बायहो आमरी समजमांनी आव्यो
सुनिल पावरा, इ. ८ वी, अनु. आश्रमशाळा, चिखली, शहादा
काही औपचारिक रितींचा आग्रह मुद्दामहून धरला. पुढे समाजात वावरताना ज्या रितीभाती पाळाव्या लागणार आहेत त्यांची ओळख यांतून व्हायची आणि याखेरीज भाषेच्या अभ्यासातल्या औपचारिक पत्रलेखन या विषयाचा सरावही होऊन जायचा. मुलांनी एका शेतकरी दादांना लिहिलेल्या पत्राचा हा एक नमुना:
काही औपचारिक रितींचा आग्रह मुद्दामहून धरला. पुढे समाजात वावरताना ज्या रितीभाती पाळाव्या लागणार आहेत त्यांची ओळख यांतून व्हायची आणि याखेरीज भाषेच्या अभ्यासातल्या औपचारिक पत्रलेखन या विषयाचा सरावही होऊन जायचा. मुलांनी एका शेतकरी दादांना लिहिलेल्या पत्राचा हा एक नमुना:
मगन वाहऱ्या पटले
शासकीय आदर्श आश्रमशाळा, देवमोगरा
दिनांक:२०/१/१३
प्रती
अरविंद वळवी
देवमोगरा, ता. नवापूर
विषय – टिकाव व फावडी मिळावी
याबाबत
महोदय,
वरील विषयान्वये आपणास
विनंती की आम्ही शाळेमध्ये परसबाग व फळबाग प्रकल्प राबवणार आहोत. तरी त्यासाठी
आम्हाला टिकाव व फावडी यांची आवश्यकता भासणार आहे. तरी आम्हाला आपणाकडून या
वस्तूंचे सहकार्य नक्कीच मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो.
आपला विश्वासू,
मगन वाहऱ्या पटले
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मगन वाहऱ्या पटले
शासकीय आदर्श आश्रमशाळा, देवमोगरा
दिनांक:२५/१/१३
प्रती
अरविंद वळवी
देवमोगरा, ता. नवापूर
विषय – आपण केलेल्या
सहकार्याबद्दल
महोदय,
वरील विषयान्वये आपणा
आम्हाला आमच्या शाळेत परसबाग व फळबाग प्रकल्प राबवत असताना आपणाकडून आम्हाला
लागणाऱ्या टिकाव व फावडी या वस्तूंची मदत झाली व त्यामुळे आम्ही आमचे काम अगदी
उत्साहात केले. यापुढेही आपण आम्हाला असेच सहकार्य कराल अशी अपेक्षा. यापुढेही आपण
केलेल्या सहकार्याबद्दल आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत.
आपला विश्वासू,
मगन
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रत्यक्ष
करता-करता शिकलेल्या गोष्टी जास्त चांगल्या कळतात, लक्षात राहतात, शिकण्याची
प्रक्रीया ही आनंदाची-मजेची होते. या सगळ्या गोष्टी आमच्या मुलांच्या बाबतीत
घडल्याच पण त्या पलिकडे आणखी एक महत्त्वाची गोष्ट साध्य करण्याचा प्रयत्न आम्ही
केला. आपल्या समाजात शेती हे ‘अडाण्याचे काम’ असा समज रूढ आहे. शिकलेल्या आणि अगदी
अर्धशिक्षित मुलांनाही शेतीत हात घालायची लाज वाटते. एकवेळ ती बेकार बसतील पण शेती
करायला नको म्हणतात. शेतीशी संबंधित अर्थिक राजकारण याला जबाबदार आहेच. पण
शेतीबद्दल समाजात जाणीवपूर्वक जोपासली गेलेली तुच्छ, नकारात्मक भावनाही त्यामागे
आहे. ‘शिक्षण-मित्र’च्या कार्यक्रमातून मुलांना हळू-हळू ही
जाणीव होत गेली की शेती हे काही ‘अडाण्याचे काम नाही’, तर शेतीला
देखील विज्ञान, तंत्रज्ञान आणि गणिताचे ज्ञान लागते. शेतकरी-कास्तकरी असणाऱ्या
त्यांच्या आई-वडील, नातेवाईकांबद्दलचा न्यूनगंड कमी होऊन त्यांच्याबद्दल सन्मानाची
भावना कदाचित निर्माण झाली असेल ही शिक्षण-मित्रची मोठीच
मिळकत म्हणायची.


Very well written. Useful documentation of an innovative initiative.
ReplyDeletewonderful activity to create awareness among parents through children. You are concentrating on 'tomorrows citizens' the young generation. if that group spirit, cooperative thinking and scientific attitude develops from young age it will change the state and India.
ReplyDeleteGreat work. There could be some path-breaking innovations that can be brought out of your work. Also what about a book?
ReplyDeleteMeena Gokhale wrote:
ReplyDeleteHi. Read your blog. Well captured the process in a short article. Very nice.
Amruta R shares:
ReplyDeleteI think we need to implement such projects for children in urban areas as well.
Vidya, Sujalataai, Sachin, Meenatai and Amruta, thanks for your feedback and comments. @ Sachin, I'm being suggested to publish a book, lets see(:
ReplyDeleteLike your earlier blog, this blog is also a brilliant read. I love the simplicity and clarity of communication in your narrations. These learning would be helpful for design of any school and community related interventions.
ReplyDeleteWarmly,
Sujata Khandekar
Pallavi Palav writes,
ReplyDeleteRead your blog. It is insightful and energetic. Children really needs a this type of live experience to Learn instead of 'RATTA'.