Sunday, December 12, 2010

पाडू चला रे भिंत ही.....


कोंबड्याच्या आरवण्याने मी जागी व्हायचे. हवेतला गारवा अजून कायम असायचा. त्यामुळे नथीताईने पांघरलेली गोधडी बाजूला करून उठायचं मन व्हायचं नाही. अशा वेळी बंद न करता येणारा गजर वाजवणार्‍या त्या कोंबड्याचा इतका राग यायचा...बाहेर आकाशात सूर्याची किरणं अद्याप फाकली नसली तरी नथीताईच्या झोपडीतला अंधार चुलीतल्या विस्तवानं संपवलेला असायचा. चुलीची उब मला आमंत्रण द्यायची आणि मी उठायचेच. नथीताई पाणी आणायला गेलेली असायची. ती येईतोवर मी आम्हा सर्वांचा चहा चुलीवर ठेवायचे - मी, ती आणि तिचा धाकटा - मोहन (तिच्या भाषेत मवन्या).


दांडाच्या कातकरी वाडीवर आले की वस्तीला मी नथीताईच्या घरीच. जेवायला मी आवर्जून वेगवेगळ्या घरांत जायचे, सगळ्यांना मी आपलीशी वाटावे म्हणून. पण वस्तीला नथीताईकडेच. अवघ्या वाडीला हा परिपाठ माहित पडला होता. तिची मुलगी तेव्हा वडिल, भाऊ-वहिनीबरोबर जगायला बाहेर पडली होती. कोण्या गावात होती कुणास ठाऊक? जोवर काही वेडावाकडा निरोप येत नाही तोवर जगायला बाहेर पडलेली माणसे खुशाल आहेत असं समजण्याचा रिवाज तेव्हा होता. आता जरा बरी परिस्थिती आहे म्हणजे बाहेर जाणार्‍या १०-२० जणांच्या जथ्यात एखादा तरी मोबाईल बाळगणारा असतो. तर तिला तिची दूर देशी असलेली मुलगी माझ्यात दिसत असावी. आणि मीही कामाच्या निमित्ताने माझे आई-वडिल, माझं घर, गाव सोडून इथं येऊन राहिलेली. मलाही तिची माया गोड वाटायची. आमच्यातल्या अर्थिक, सामाजिक, शैक्षणिक अंतराच्या पार जाऊन आमच्यातलं हे माय-लेकीचं अनोखं नात विणलं गेल. ते काम सोडल्यावर जेव्हा त्या परिसराचा, तिथल्या लोकांचा निरोप घेण्याची वेळ आली तेव्हा नथीताईचा, मोहनचा निरोप घेणं विशेष जड गेलं मला........


मुंबईला शिकत असताना शैक्षणिक कोर्सचा भाग म्हणून एक वर्ष आठवड्यातून २ दिवस एका मुस्लिम अनाथालयात काम केलं. सुरुवातीला माझं स्वागत संशयाच्या, दुराव्याच्या आणि काहीशा तिरस्काराच्या नजरांनी झालं. मलाही माझी भाषा, संस्कृती, धर्म या सगळ्या आवरणांतून बाहेर पडून त्यांच्याशी संवाद साधायला वेळ लागला. पण वर्षांनंतर निरोप घेताना माझ्याकडे तिरस्काराने पाहणार्‍या मुली माझ्या गळ्यात पडून रडल्या. एक माणूस म्हणून त्यांच्यातल्य़ा माणूसपणाशी मी नातं जोडू शकले ही माझी मोलाची कमाई होती. सुरूवातीच्या कसोटीच्या काळात माझ्या पाठीशी उभी राहिलेली, मला आधार देणारी शिबा तर माझी मोठी बहीणच झाली होती.

PG level लाही चुकारपणे शिल्लक राहिलेलं माझ्यातलं बालपण कौतुकाने जपू पाहणारा केरळचा मित्र डेव्हिस, देवासच्या वास्तव्यात घराची उणीव भासू नये म्हणून धडपडणारी अनू..... भारताच्या विविध प्रांतातल्या सख्ख्या मैत्रिणी आणि मित्र. ह्र्दयाच्या तारा जुळायला वेगळी भाषा, वेगळ्या चालीरिती आड नाही आल्या.


माझ्या कामाच्या निमित्ताने जात, धर्म, प्रांत, अर्थिक-सामाजिक स्तर, विचारसरणी अशा एरवी आड येणार्‍या भिंती ओलांडून भिंतींपलिकडल्या माणसांना भेटता आलं. त्यांच्यातलं बरं-वाईट अनुभवता आलं अर्थात त्यासाठी आपणही आपली तथाकथित ओळख सांगणार्‍या झुली उतरवून ठेवाव्या लागतात.
 
त्याआधी समाजशास्त्राची विद्यार्थिनी म्हणून समाजातले ताणेबाणे, वेगवेगळ्या समाजगटांच्या विविध अस्मिता प्रकट करणारे विविध गट, स्तर यांचा एक तटस्थ निरिक्षण, अभ्यास केलेला होता. अशा अस्मिता सामाजिक संरचनेचा एक अपरिहार्य भाग आहेत आणि त्यांच्यातले ताणेबाणे सामाजिक प्रक्रीयांचा स्वाभाविक भाग आहेत हे समाजशास्त्राने शिकवलं होतं. पण हेही शिकवलं होत की समाजगटांच्या अस्मिता कालसापेक्ष असतात. किंबहुना एकाच कालखंडात परिस्थितीनुसार आपलेआणि त्यांचेह्या ओळखी बदलत असतात. 

आयुष्यातल्या अनुभवांनी हे शिकवलं की वेगवेगळ्या अस्मितांच्या आत एक माणूस दडलेला असतो आणि वरवरचे वेगळेपणाचे पापुद्रे उलगडले की आतल्या निखळ माणसाला भेटण्याचा आनंद वेगळाच असतो. प्रखर अस्मितांचे टोकदार झेंडे नाचवणार्‍यांना हे कोण सांगेल?
 
आम्ही आमच्या शिबिरात, बैठकांमध्ये म्हणत असलेलं एक गाणं आठवतं
’पाडू चला रे भिंत ही मधे आड येणारी
या मनामानातून बांधूया एक वाट जाणारी.....’
पाडू चला रे भिंत ही.....

5 comments:

  1. Very Good! Don't know what to comment more. But starting paragraph and picture is awesome!

    ReplyDelete
  2. keep it up... you always unfold 'life' that is alien to us.

    ReplyDelete
  3. Vijaya Chauhan wrote
    चित्रासहीत लिहिलेला हा लेख किंवा मुक्त चिंतन अतिशय वाचनीय आणि अनेक स्मृति जागवणारे आहे.अनाथालयातल्या मुलींचा उल्लेख पण छान आहे. तुझे हे अंग नव्याने कळले.एवढ्या व्यापात हे संवेदनशील मन जपतेस याचे कौतुक वाटले. आनंद वाटला.लिहित राहा तू लिहित राहा.

    ReplyDelete
  4. अमृता रोहीत लिहिते
    खूप छान. सगळ्यांना असच वाटत असतं but very few like u actually try for
    this.


    Shriniwas wrote
    Both of your posts are nice. Congratulations for it.

    Chandrakant wrote
    Thanks Rajashri, for sharing this one. Very interesting write up. Keep it up.

    Narendra wrote
    Nice blog posts. Both posts are very revealing and touching. Keep it up.....

    ReplyDelete
  5. Siddhartha, Mahesh, Vijayatai, Amruta, Shriniwas, Chandrakantji, Narendra

    I thank you all for responding and encouraging!

    ReplyDelete