Wednesday, June 22, 2011

स्यमंतक - एक अनघड वाट
स्यमन्तक’ - बिन भिंतींची उघडी शाळा’. त्यांची website पाहून विज्ञानाश्रमाच्या धर्तीचं पण त्यापेक्षा वेगळं काही तरी असावं असं वाटतं होतं. अशा प्रकारच्या skill training देणार्‍या संस्थांच्या शोधात आम्ही होतोच. मग जायचं ठरवलं.

 धामापूरला उतरलो तेव्हा लाल चिर्‍यांच्या घरांच्या रांगेतल्या एका घराकडे बाण दाखवणारी ’स्यमंतक’ची पाटी पाहून बुचकळ्यात पडायला झालं. संस्था म्हटल्यावर जो एक set up डोळ्यासमोर येतो तसं तिथे काहीच नव्हतं. झालच तर बाहेरच्या भिंतीवर लावलेला एक फलक, तापमापी, मोजपात्रे, अंगणातला solar heater अशा वस्तूंचे अस्तित्व या घराचे वेगळेपण दाखवत होते.

सचिन आणि मीनल देसाई यांनी सुरू केलेला हा शैक्षणिक प्रयोग. महाराष्ट्रातील इतर अनेक शैक्षणिक प्रयोगांप्रमाणेच मुलीला सध्या अस्तित्वात असलेल्या शिक्षणव्यस्थेत घालायचे नाही म्हणून स्वतःच स्वतःच्या शैक्षणिक संकल्पनांवर आधारलेली शिक्षण संस्था काढण्यापासून स्यमंतकची सुरूवात झाली. त्याआधी व्यवसायाच्या निमित्ताने विज्ञानाश्रमाशी  संबंध आला होता. प्रत्यक्ष अनुभव घेत, हाताने काम करत शिक्षण आणि ग्रामीण जीवनात आवश्यक अशा अनेकविध कौशल्यांचे शिक्षण ही
विज्ञानाश्रमाची तत्वे सचिन यांना भावली होती.

त्यामुळे विज्ञानाश्रमाच्या Deploma in Basic Rural Technology या course वर आधारित शिक्षण प्रयोग त्यांनी धामापूरला सुरू केला. दोन पिढ्या बंद असलेले जुने वडिलोपार्जित घर पुन्हा राहते करणे हा शिकण्यासाठीचा base ठरला - त्याची डागडुजी, वायरिंग, संडास, सिंक, टाकी अशा गोष्टींची बांधणी, रोजचा स्वयंपाक, त्यासाठी परसबाग - अशा रोजच्या जगण्यासाठी आवश्यक अशा गोष्टी, त्यातली आव्हाने हाच अभ्यासक्रम.

DBRT वर आधरित असला तरी ’स्यमंतक’ या संस्थेची आणि तिथल्या शिक्षणाची स्वतःची अशी काही वैशिष्ट्ये आहेत. विद्यार्थी संख्या अगदी जाणीवपूर्वक कमी ठेवलेली आहे. सहसा ५-६ मुलांच्या वर विद्यार्थी घेतले जात नाहीत म्हणजे प्रत्येक मुलाकडे वैयक्तिकरित्या लक्ष देता येतं. Multi-skilled course असला तरी प्रत्येक कौशल्य प्रत्येक मुलाने शिकलेच पाहिजे असा आग्रह नाही. त्यातल्या
एखाद्या कौशल्यात विशेष रस वाटला, विशेष गती असली तर तेच कौशल्य त्याला / तिला खोलात जाऊन शिकता येतं.

दुसरं महत्त्वाचं म्हणजे शिक्षक-विद्यार्थी असं द्वैत नाही किंबहुना विद्यार्थ्यांनी पुस्तकं, आणि
एकमेकांच्या  मदतीने शिकण्यावर खूप भर आहे. सुरूवातीला जुनी अनुभवी मुलं नव्यांना शिकवतातयाकडे मी थोडं अविश्विसाने पाहिलं. पण  तिथल्या मुक्कामात ही प्रक्रीया जवळून पहायला मिळाली, तेव्हा त्याची strength लक्षात आली. सवंगडी शिक्षक / मार्गदर्शक तज्ज्ञ नसतात पण त्यांचं  तज्ज्ञ      नसणंच शिकण्याची प्रक्रीया सहज आणि तणावरहित बनवतं. समवयस्क सवंगडी जेव्हा शिक्षक किंवा मार्गदर्शक म्हणून काम करतात तेव्हा त्यांच्या मनातली त्यांची शिकण्याची प्रक्रीयाअजून शिळी झालेली नसते. त्यांनी केलेल्य़ा चुका, त्यांना शिकताना आलेल्या अडचणी आणि शिकताना आलेली गंमतसुद्धा...हे सगळं त्यांच्या मनात ताजं असतं. त्याचा याबाबतीतलं सहजस्फूर्त sharing हा दिलासा शिकणार्‍याला देतं की ’हा/ही जे आज माझ्या २ पावलं पुढे आहेत, ते एके काळी माझ्या जागी होते. त्यांनीही चुका केल्या आहेत. त्यांनाही अपयश आलं होतं. पण त्यातूनच आज ते पुढे गेले. माझ्यापेक्षा ते फार वेगळे नाहीत. मीही त्यांच्यासारखा होऊ शकतो/ते. प्रौढ शिक्षक एकतर स्वतःची ही प्रक्रीया विसरलेले असतात किंवा ’सर्वज्ञ’ असण्याचं दडपणापायी ते ’चुकीतून शिकणं ’ किंवा माहिती नसलेली एखादी गोष्ट वेगवेगळ्या मार्गांनी माहिती करून घेण्याच्या अनुभवाची ओळख मुलांना करून द्यायला नाखूष असतात.   

रोजचं जगणं हा शैक्षणिक अनुभव हे स्यमंतकच्या शिक्षणाचं सूत्रं आहे त्यामुळे स्वयंपाकघरात
एखादा विशेष पदार्थ बनविणे किंवा आजारपण हाही शैक्षणिक अनुभव होतो. बनवायच्या पदार्थाच्या घटक पदार्थांचे वजन, त्यांच्या किंमती, तयार करण्याची कृती, तयार झालेल्या पदार्थाचे वजन, त्याचा बाजारभाव या सगळ्याच्या नोंदी पदार्थ बनवताना ठेवण्याची पद्धत आहे. त्यातून तो पदार्थ बनवणं फायद्यात गेलं की तोट्यात याचा विचार होतो. त्याचबरोबर त्या पदार्थाच्या पोषणमूल्यांचा आणि ती पोषणमूल्ये वाढावित यासाठी तयार करण्याच्या प्रक्रीयेत काही बदल करावा लागेल का याचाही विचार होतो.

या सगळ्या प्रक्रीयेतूनच मुलांमधली शोधक वृत्ती जागृत होत आहे. त्यांना ज्ञान संपादन करण्याच्या विविध माध्यमांची ओळख करून दिली जाते जसे पुस्तके, विविध तज्ज्ञ व्यक्ती/संस्था वगैरेइंग्रजी सुधारण्यासाठी मुले वेगवेगळ्या पुस्तकांची मदत घेऊन रोज एक सुविचारवजा वाक्य शोधतात आणि ते फळ्यावर लिहितात. संध्याकाळी सर्वांनी ते योग्य उच्चारात वाचून त्याचा अर्थ सांगायचा असतो. त्यासाठी डिक्शनरी वापरावी लागते. संदर्भवाचनासोबतच इंग्रजी आत्मविश्वासाने वाचा-बोलायसाठी या उपक्रमाचा उपयोग होतो.

या सगळ्या माध्यमांचा उपयोग करून वैभव या विद्यार्थ्याने गोपालन या विषयात खरोखरी बरेच सखोल ज्ञान मिळवले आहे. अर्थात त्याची स्वतःची अत्यंत बारीक-सारीक निरिक्षणे आहेतच. स्यमंतकमध्ये basic course झाल्यावर वैभव मध्यप्रदेशात एका संस्थेत बांबूकामावरची कलाकारी आणि गोपालन शिकायला गेला. तिथे त्याच्यावर ५० गाईंचा पूर्ण गोठाच सांभाळायची जबाबदारी आली. बांबूकाम न शिकायला मिळाल्याची निराशा होती पण गोपालनात खूप शिकायला मिळालं आणि त्यात रसही निर्माण झाला. सध्या वैभव स्यमंतकमध्ये राहून गीर गायी व तिची २ वासरे असलेलं गोपालन केंद्र स्वयंपूर्ण कसं करता येइल यावर सचिनजींच्या मदतीने आणि त्या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करत आहे. गाय व तिचे वासरू यांचे शोषण न होता केंद्र अर्थिकदृष्ट्या लाभदायी करायचे असेल तर दूधाबरोबरच शेण आणि गोमूत्र या गौत्पादनांचाही विचार करावा लागेल आणि त्यांच्यापासून कोणकोणती उत्पादने बनू शकतील यावर संशोधन करावे लागेल या विचारधारेवर आधारित काम तो करत आहे. १०वी पास असलेल्या वैभवला आता याच विषयात Ph. D. करण्याची इच्छा आहे. त्यासाठी तो पुढील शिक्षण घेणार आहे.

यशस्वी प्रकल्प किंवा संकल्पनांचं replication दुसर्‍या ठिकाणी करणं किंवा प्रकल्पाच्या शिल्पकाराने इतरत्र प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपल्यासारखे काम करणारे लोक तयार करणं ही एक लोकप्रिय संकल्पना. स्यमंतकला मात्र स्वतःचे दुसरे model उभे करायचे नाही. तो परिसर, तिथलं लोकजीवन, तिथला निसर्ग, राहणीमान आणि काम करणार्‍या दुसर्‍या माणसाची किंवा संस्थेची कार्यपद्धती यानुसार त्या-त्या कामाचे स्वरुप ठरत जाणार असा सचिनजींचा विश्वास आहे. गडचिरोलीत स्यमंतकच्या संकल्पनेवरती आधारित काम उभं राह्त आहे पण स्यमंतकची त्यातली भूमिका ही वाटाड्याची असेल. प्रत्यक्षात तिथली काम उभी करणारी संस्था आणि स्यमंतक मध्ये सध्या basic course मधून तयार होत असलेला प्रवर्तक प्रकाश हेच त्यांच्या प्रकृतीनुसार आणि तिथल्या गरजेनुसार कामाचे स्वरुप ठरेल.


दुसरं म्हणजे संस्थेचं काम हे कार्यकर्त्यांच्या उत्पन्नाचं साधन बनलं की अनेक प्रश्न उभे राहतात. सचिन व मीनल या दोघांनाही याला पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला आहे. संस्थेचं पूर्ण वेळ पगारी नोकर दोघांपैकी कोणीच नाही. सचिनजी संस्थेच्या ट्रस्टवर असल्याने मीनलताई प्रकल्पांच्या पदाधिकारी म्हणून काम बघतात आणि कामाचे स्वरूप असेल त्याप्रमाणे मानधन घेतात. पण ही व्यवस्था कायमस्वरूपी नाही. मुलांप्रमाणेच त्यांनीही स्वतःयोग्य काम सतत निर्माण करून त्यातून मिळकत करण्याची अपेक्षा आहे.

केवळ तंत्रशिक्षण नव्हे तर मूल्यशिक्षणावरही स्यमंतकचा स्वतंत्र विचार व प्रयत्न आहेत. तुम्ही शिक्षण क्षेत्राशी संबंधित असलात किंवा नसलात तरी सामाजिक कामातले काही वेगळे परिपाठ निर्माण करू पाहणार्‍या या आधुनिक गुरूकुलाला भेट देण नक्कीच worth आहे.

2 comments:

  1. स्यमंतक या नावामागे पण काही इतिहास आहे का? अन्यथा जो विचार संस्था मांडते आहे त्याच्याशी इतके अवघड नाव विसंगत वाटते!

    ReplyDelete
  2. Syamantak was a bid on the head of Ashwatthama I guess. I'm also thinking about this name for such initiatives in education.

    ReplyDelete