कंवाटमध्ये गेले होते आणि पूर्वेकडे मध्य प्रदेशाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या सिंगलदा नावाच्या गावी निघाले होते. बाजूने वाहणाऱ्या नदीकडे बोट दाखवून मी विचारलं, 'ही ओरसंग का?' जसवंतभाई म्हणाले, 'नाही, ही करा नदी.' मग पुढे त्यांनी आणखी माहिती पुरवली. या परिसरात ओरसंग, हेरण, आनी, करा अशा अनेक नद्या आहेत. एखाद्या वर्षी पावसाळ्यात करा नदीला इतर नद्यांच्या आधी पाणी आले तर त्यावर्षी पीक चांगले येत नाही अशी बोलवा आहे. हे ऐकून माझी उत्सुकता जागी झाली. करा नदीला पाणी पहिल्यांदा येणे म्हणजे कंवाट तालुक्यातील पूर्व भागात (गुजरातच्या उत्तर-पूर्व सीमेवर) पाऊस पहिल्यांदा पडणे, म्हणजेच वाऱ्यांची विशिष्ट दिशा असणे, त्याच्याशी हवामानाचा काही संबंध असणे…. या सगळ्याची उत्तरं अर्थातच माझ्या सहकार्यांकडे नसणार होती.
येताना परतीच्या रस्त्यात मी वाटेतल्या सगळ्या नद्यांची ओळख करून घेतली. माझा हा नद्यांमधला इंटरेस्ट पाहून आमचे ड्रायव्हर ईश्वरभाई यांनी स्वतःहूनच एका जलप्रवाहाशी माझी ओळख करून दिली. तो नद होता - झरवा, आणि त्याला चिकटलेली एक कहाणीही होती. झरवाआणि ओरसंग यांनी लग्न करायचं ठरवलं. झरवा लग्नासाठी निघालेला असताना वाटेत काही मोठे दगड आडवे आले आणि त्याला पोहोचायला उशीर झाला. पण ओरसंग त्याची वाट न पाहता निघून गेली. त्यांचं लग्न होऊ शकलं नाही. ओरसंगच्या प्रतारणेमुळे निराश झालेल्या आणि संतापलेल्या झरवाने तिला शाप दिला, 'यापुढे तुझं वाहतं पाणी कोणीही पिणार नाही.' आजही या भागातले लोक ओरसंगचं वाहतं पाणी पीत नाहीत. पाणी प्यायचं झालं तर खड्डा खणून, त्यात थांबवलेलं पाणीच पितात. मुळात ओरसंगमध्ये पाणी रहातच नाही. भर पावसाळ्यातही ओरसंग दुथडी भरून वाहताना दिसत नाही. मुरमी, रेताड तळ ती भर पावसाळ्यातही दाखवत राहते. ओरसंगचं पाणी जमिनीत झिरपतं. लोक विहिरी आणि बोअर वेल खणून ते पाणी पितात.
लोककथेतून होणारी ही पर्यावरणाची ओळख मला फार इंटरेस्टिंग वाटली. खरं तर भूगोलाच्या पुस्तकाला अशी त्या-त्या ठिकाणच्या लोक कथांची आणि लोक मान्यतांची पुरवणी जोडता येऊ शकेल. तालुका स्तरावरच्या BRC ने रस घेतला तर सहज शक्य आहे हे. भूगोल तर इंटरेस्टिंग होईलच पण अनुभवातून मिळवलेल्या स्थानिक शहाणपणाला आणि ज्ञानाला शिक्षणाच्या आणि पर्यायाने ज्ञानप्राप्तीच्या मुख्य धारेत स्थान मिळेल. त्याचं आपोआपच संवर्धनही होईल.
ओरसंग-झरवा पुढे स्वतंत्रपणे हेरण नदीला जाऊन मिळतात आणि मग तिच्याकरवी नर्मदेला.
मला सहजिकच नर्मदा आणि शोण नदाच्या कथेची आठवण आली. अमरकंटकला गेले असताना नर्मदेच्या उगमाचं यथासांग दर्शन झाल्यावर शोण नदाचं उगमस्थान पाहायलाही गेलो होतो. उंच कड्यावरून स्वतःला झोकून देणारा शोण खालच्या जंगलात कुठं नाहीसा झाला होता ते दिसतही नव्हतं. खोलवर खाली समोर छत्तीसगडच्या सीमेपर्यंत पसरलेलं दाट, हिरवगार जंगल होतं.
शोणाचं लग्न नर्मदेशी ठरलं पण तिच्याशी लग्न करायला आलेला शोण तिच्या सखीच्या मोहात अडकला. आपल्या सखीसमवेत रममाण झालेल्या शोणाला पाहून मानी नर्मदा संतापली, दुखावली. ना ती रडत-कुढत बसली, ना आपल्या प्रेमाशी प्रतारणा करणाऱ्या आपल्या प्रियकराला तिनं शापलं. ती थेट स्वतःच्या वाटेने चालू लागली. अतिशय खडतर रस्ता तिनं स्वीकारला. सातपुड्याच्या दऱ्या-खोऱ्यातून जंगलं तुडवत ती चालत राहिली. काठावरच्या विविध आदिवासींना जीवन देत राहिली. शिवाला प्रिय झाली. स्वतःची स्वतंत्र ओळख घेऊन अरबी समुद्राला मिळाली. वाटेतल्या इतर नद्यांनी स्वतःला तिच्यात विसर्जित केलं. उभ्या भारतवर्षात अन्य कोणाही नदीभोवती नसलेलं परीक्रमेचं वलय तिच्याभोवती विणलं गेलं.
इकडे शोण उलट दिशेने पूर्वेकडे निघाला. पुढे गंगेला जाऊन मिळाला. शोणाची ओळख आज निव्वळ नर्मदेमुळे आहे. एरवी भारतातल्या हजारो-लाखो जलाप्रवाहांपैकीच तो एक.
स्त्रीच्या उदार, क्षमाशील आणि धीरोदात्त वृत्तीचे प्रतिनिधित्व करणारी नर्मदा प्रेमाला एका वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवते. शोणाच्या बाबतीत असफल झालेले प्रेम ती विशाल करून लाखो आदिवासींमध्ये मुक्तपणे प्रवाही करते. प्रेम हे तिच्यासाठी बेडी न राहता स्वतःपलीकडे जाण्याचं माध्यम बनतं. पुरुषी चंचल वृत्तीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शोणाला नंतर पश्चाताप झाला असेल का?
अर्थात याचीच उलटी आवृत्ती ओरसंग-झरवाच्या कहाणीत पाहायला मिळते. पण झरवा नर्मदेसारखी क्षमाशीलता आणि धीरोदात्तपणा नाही दाखवू शकला. त्याने ओरसंगला धिक्कारले, शापले, हेही पुरुषी अहंभावाचे लक्षण असावे का?
किती जलप्रवाहांशी मानवी प्रवृत्तींचे आरोपण करणाऱ्या अशा अधुऱ्या प्रेमाच्या, हुकलेल्या मिलनाच्या कहाण्या जोडलेल्या असतील? जवळ उगम पावणाऱ्या किंवा वाहता-वाहता जवळ आलेल्या पण एकमेकांमध्ये मिसळायचं सोडून समांतर वाट धरलेल्या किंवा विरुद्ध वाटेने चालू लागलेल्या जलप्रवाहांना अशा कहाण्या आपसूक जोडल्या जातात की काय? मानवी जीवनातलं असाफ़ल्य, अधुरेपण आणि त्यातून येणारी हुरहूर निसर्गात प्रतिबिंबित करून माणूस निसर्गाशी एक जिवंत, भावनेने ओथम्बलेलं नातंच जोडत असतो जणू आणि त्यातून त्याला विसावा, जगण्यासाठीचं बळ मिळत असावं.
तुझ अनवट वाट व त्याखालील एक पद्य व एक गद्य असे तीन पोस्ट वाचले,मजा आली
ReplyDeleteसुहासताई
khoop sundar maitrinee...Prachi Dublay
ReplyDeleteVery interesting to read stories about rivers.
ReplyDeleteYour point of teaching geography through folk tales attached to regions is very interesting. Look forward to more write-ups.
Pratibha Athalye