Friday, April 14, 2017

अशी आमची मुले.....रानची फुले




माझ्या blog चं नावच अनवट वाटा. कॉलेजमध्ये असताना एका अचानक एका वळणावर आदिवासी समाजाशी विशेषतः आदिवासी मुलांशी परिचय झाला. त्यांनीच पुढे फारशा न मळलेल्या अनवट वाटांवर चालायची प्रेरणा दिली. या मुलांबरोबर काम करताना उदंड समाधान, आनंद तर मिळालाच पण खरं सांगायचं तर माझी मलाच मी सापडत गेले. त्याबद्दलची कृतज्ञता म्हणून मला हा समाज, ही मुले जशी दिसली, त्यांची जी ओळख झाली ती अनेकांपर्यंत पोचवण्यासाठी इथून हा लेखन प्रपंच.हे लेख लिहिण्यासाठी मला मिळून साऱ्याजणीने प्रवृत्त केले, विद्याताई व गीतालीताई यांचे त्यासाठी विशेष आभार.

MSW करत असताना MA dissertation साठी विषय निवडायचा होता. पद्मा वेलासकर, माझ्या मार्गदर्शकांनी मला सुचवलेला विषय होता – ‘शहरी मध्यमवर्गीय व निम्नस्तरीय मुलांचे विश्व’. पुढे विविध कारणांनी हा विषय मी MA dissertation साठी नाही घेऊ शकले पण ‘मुलांचे विश्व’ हा आपल्या देशात दुर्लक्षित असलेला विषय माझ्या मनात रेंगाळत राहिला. पुढे जेंव्हा ठरवून आदिवासी मुलांच्या शिक्षण प्रश्नावर काम केलं तेंव्हा आदिवासी मुलांचे विश्व हा अधिकच दुर्लक्षित किंबहुना अंधारातलाच विषय असल्याचे जाणवत गेले. सर्व सामान्य आणि थोड्याफार जागृतही समाजाच्या डोळ्यासमोर आदिवासी समाज व मुलांचे जीवन म्हणजे अज्ञान, दारिद्र्य, अंधश्रद्धा, शोषण अशा शब्दांशीच निगडीत आहे. आदिवासी मुले म्हटले की कुपोषण, शाळाबाह्य मुले, शिक्षणातली गळती, प्रमाण भाषेतून शिकण्याची समस्या, बालमजुरी, आश्रम शाळांचे भयाण वास्तव, गुणवत्ताहीन शिक्षण अशाच बातम्यांचे मथळे डोळ्यासमोर येतात. माझीही वेगळी परिस्थिती नव्हती सुरुवातीला कारण त्यात वास्तव आहेच.
पण सुदैवाने मला या मुलांना भेटण्याची, त्यांच्याबरोबर राहण्याची, काम करण्याची, त्यांच्याशी गप्पा मारण्याची संधी मिळाली. त्यातून या समस्यांपलीकडे असलेले या मुलांचे अस्तित्व, त्यांच्यातले काही पैलू, त्यांचे भावविश्व मला उलगडत गेले. पडसऱ्याच्या १०० दिवसांच्या अनौपचारिक शाळेत मला ती पहिल्यांदा भेटली. काळी-सावळी, बोलक्या डोळ्यांची, बिनधास्त, आम्हाला ‘ए बाई sss किंवा ए सर sss’ अशी हाक मारत हेल काढून बोलणारी, सुरेल गळ्यांची, टोकदार व्यक्तिमत्वांची तरीही लाघवी. किती वेगवेगळ्या रुपात ही मुले मला भेटली! सगळी अक्षरे उलटी काढणारी पण जंगल अचूक वाचणारी गोड, लाजरी धानी. आई-वडील अनुत्सुक असतानाही शाळेत जायचा निर्णय स्वतःच घेणारी आणि त्यासाठी ५-६ वर्षाच्या धाकट्या भावाला - बारला सोबत घेऊन जवळपास ८ किलोमीटरची एकाकी जंगलवाट अत्यंत निर्भयपणे चालून येणारी ८-९ वर्षांची धिटुकली-पिटुकली लता. शाळेत आपापल्या वाडीचे नेतृत्व करणारे आणि प्रसंगी आपल्या ‘दादागिरी’मुळे शाळेतल्या शिक्षकांच्या नाकी नऊ आणण्याची धमक असणारे आणि तरीही अंगातल्या क्षमतांमुळे सर्वांचे लाडके असणारे कृष्णा आणि ज्ञानेश्वर. शाळेत अभ्यासू किडा असणारा आणि नंतर मात्र स्वतःतले सुप्त गुण दाखवत वाडीमध्ये दारूबंदीसाठी प्रयत्न करताना अख्ख्या वाडीशी पंगा घेणारा चंद्रा. एका वर्षात ३री आणि ४थी इयत्ता (उड्डाण परीक्षा) देवून १ल्या नंबराने पास होणारा स्कॉलर नवशा. जिद्दीने शिकून दुधनीच्या ठाकर वाडीतली पहिली नर्स होणारी ललिता. पुढे बायफ विकास अनुसंधान संस्थेच्या माध्यमातून कोकणापासून via खानदेश विदर्भापर्यंत, आदिवासी बहुल अशा १५ जिल्ह्यातल्या आश्रम शाळांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. इथे अनेक आदिवासी समाजातल्या मुला-मुलींना भेटले. प्रतिकूल परिस्थितीतही नुसतं तग धरून नव्हे तर आनंदी आणि आशावादी रहायची त्यांच्यातली जिद्द मला भावली. खडकाळ माळावरच्या एखाद्या रानफुलानं पावसाच्या इवलाश्या सरीचा आधार घेऊन तरारून उठावं अशी ही मुले ‘बायफ’च्या ‘शिक्षण-मित्र’ कार्यक्रमाच्या संधीने फुलून आली आणि सगळा माळ रंगीबिरंगी फुलांनी फुलून यावा तसं त्यांच्यातल्या विविध क्षमतांच्या आणि गुणांच्या आविष्काराने मी थक्क झाले. खेळातली कोडीच नव्हे तर प्रत्यक्ष आयुष्यातली कोडीही नेहमीच out of the box विचार करून अफलातून पद्धतीने सोडवणारी मुले ही मुले माझ्या मनात घर करून राहिली. आश्रम शाळांच्या निरस आणि नाउमेद करणाऱ्या वातावरणातही संधी मिळाली तर ही मुले काय करून दाखवू शकतात हे जे मी अनुभवलं ते मला तुम्हा सगळ्यांपर्यंत या लेखांच्या माध्यमातून पोचवायला आवडेल. त्यांच्यात टिकून असलेली निर्व्याजता, आयुष्याकडे बघण्याचा हटके दृष्टीकोन, प्रतिकूल परीस्थितीतूनही मार्ग काढण्याची क्षमता, मजबूत गटभावना, त्यातून येणारी संवेदनशीलता पण त्याचवेळी प्रसंगी रोकठोकपणा; मी या मुलांच्या नुसती प्रेमात नाही पडले,  तर माझ्या आनंदाचा, माझ्या काम करण्याच्या प्रेरणेचा ती स्त्रोत आहेत.
या मुलांना मी प्रामुख्याने भेटले ते आश्रम शाळांच्या परिसरात. आश्रम शाळांबद्दल वर्तमानपत्रात येणाऱ्या बातम्यांमधून आपली आश्रम शाळांबद्दलची प्रतिमा तयार झालेली असते. ती बहुतांशी नकारार्थीच असते आणि त्यात तथ्य आहेच. आश्रम शाळांमधील गैरकारभाराच्या, शोषणाच्या बातम्या वर्तमानपत्रात येतात. काही दिवस आश्रम शाळांच्या कारभारावर, मुलांच्या दुरवस्थेवर चर्चा, परिसंवाद घडतात, शिक्षक, मुख्याध्यापकांना निलंबित करण्याची ‘कारवाई’ केली जाते आणि मग सगळे पुन्हा शांत – परत पाहिल्यासारखे. या सगळ्या गदारोळात मुळातले वरपासून खालपर्यंत असणाऱ्या व्यवस्थापनाचे, मनुष्य बळ रचनेचे,  त्यांच्या सक्षमीकरणाचे, दृष्टीकोन बदलाचे आणि मुख्य म्हणजे धोरण बदलाचे जे मुद्दे आहेत ते दुर्लक्षिले जातात. महाराष्ट्रात ११०३ आश्रम शाळा आहेत आणि अत्यंत दुर्गम अशा परिसरातल्या आदिवासी मुलांनाही शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यामध्ये त्यांचे योगदान आहे हे विसरता येणार नाही. अनेक आदिवासी समाज डोंगरमाथे किंवा दुर्गम जंगलातल्या वाड्या/पाड्यांवर विखुरलेल्या स्वरुपात अत्यंत कमी लोकवस्तीने राहतात. तिथे जिल्हा परिषदेची शाळा सुरु करणे शक्य नसते किंवा अनेकदा अशा दुर्गम परिसरातल्या शाळा केवळ कागदावर असतात. अनेक आदिवासी पालकांना आजही वर्षातून ६ महिने जगायला बाहेर पडावे लागते अशा परिस्थितीत त्यांना निवासी आश्रम शाळांचा आधार वाटणे स्वाभाविक आहे. कित्येक आश्रम शाळांमध्ये मुलांबद्दल आत्मीयता असणारे, मनापासून काम करू इच्छीणारे शिक्षक मला भेटले आहेत. केवळ नकारात्मक चित्राच्या पलीकडेही या शाळांची काही वेगळी बाजू असू शकते हेही मान्य करायलाच हवं. आश्रम शाळांची आदिवासी मुलांच्या शिक्षणातली भूमिका, त्यांचं बरं-वाईट वास्तव आणि त्यातले खोलवर गुंतलेले प्रश्न जसे मला समजले आहेत तसे तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न मला करायचा आहे. अपेक्षा ही की एकत्रित विचार मंथनातून ‘systemic’ उत्तरं शोधायला मदत व्हावी.
आजही आदिवासी मुलांचे शिक्षणातले गळतीचे प्रमाण लक्षणीय आहे. शिक्षणाची गुणवत्ता चांगली नसणे हे एक कारण आहेच, मग त्या आश्रम शाळा असो की अनिवासी जिल्हा परिषद शाळा. पण शाळांमधून दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचा सांधा या मुलांच्या आयुष्याशी जोडलेला नसणे ही एक महत्वाची पण त्यामानाने दुर्लक्षिली गेलेली समस्या आहे. या मुलांसाठी असणाऱ्या शाळांच्या इमारती, त्या शाळांच्या वेळा आणि वार्षिक कॅलेंडर, शाळांमधून शिकविल्या जाणाऱ्या पुस्तकातला आशय, त्यातली भाषा आणि शिकविण्याची पद्धती या कशाचाच या मुलांच्या परिसराशी, त्यांच्या दैनदिन जीवनातल्या अनुभवांशी सांधा नाहीये याचीही नोंद अभ्यास साहित्यातून आताशा घेतली जाऊ लागली आहे. त्यामुळे या मुलांना सगळं शिक्षण परकं वाटत आणि शिकण्यातला रस संपतो.
शिक्षण-मित्र कार्यक्रमाचा गाभाच मुळी शिकणं मुलांच्या जीवनानुभवाशी जोडणं हा होता. शेती, आरोग्य, नागरी संस्था व नागरिकांचे हक्क व कर्तव्ये या क्षेत्रातले विविध प्रकल्प मुलांनी केले. विज्ञान, गणित, नागरिक शास्त्र आणि भाषेच्या पुस्तकांमधले संदर्भ त्यांना या अनुभवांमध्ये भेटावे यासाठी आम्ही प्रयत्नशील राहिलो.
या प्रकल्पांदरम्यान अनेक शेतकरी, बचत गटातील महिला, शासकीय अधिकारी, सहकारी संस्थांचे आदिवासी पदाधिकारी यांना भेटण्याची संधी मुलांना मिळाली. स्वतःचा समाज, स्वतःची भाषा याबद्दलच्या न्यूनगंडातून बाहेर काढण्यासाठी याचा उपयोग झाला. शेती हे अडाण्याचे काम नाही तर त्यालाही विज्ञान, गणित, तंत्रज्ञानाची समज आवश्यक असते ही जाणीव काही प्रमाणात आम्ही मुलांच्या मनात जागृत करू शकलो.
ही गोष्ट महत्वाची होती कारण  ‘शहरी-औद्योगिक म्हणजे आधुनिक’ अशी सरधोपट व्याख्या रूढ असलेल्या आपल्या समाजात आदिवासी = मागास हे समीकरण रूढ झालेले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे ज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा साठा असू शकतो आणि इतकेच नव्हे तर ‘आधुनिक’ मानल्या गेलेल्या समाजाला त्यांच्याकडून काही शिकण्यासारखे असू शकते असा विचारही होत नाही. परंतु वास्तवात त्यांची बांबू काढण्याची पद्धत असो, मधाचे पोळे काढण्याची पद्धत असो, मासे पकडण्यासाठी बांबूच्या  जाळ्या विणण्याच्या विविध पद्धती असो, शेतीसाठी पाण्याची केलेली वाहतूक असो या सगळ्यात तंत्रज्ञान आहे आणि ‘आपल्या परीसंस्थेच्या मुळावर घाव न घालता तिच्याशी व्यवहार करण्याचे’ तत्त्वज्ञानही आहे. तंत्रनिष्ठेचा अतिरेकी अभिमान आणि भौतिक समृद्धीच्या सोसात तथाकथित ‘विकसित’ समाज स्वतःला निसर्गातल्या इतर घटकांपेक्षा वेगळा आणि श्रेष्ठ मानू लागला आहे. स्वतःला सृष्टीचा एक भागच मानून जगण्याची, कृतज्ञतेची वृत्ती आधुनिक समाजाने गमावली आहे. त्याचे परिणामही आपण वैयक्तिक स्तरापासून जागतिक स्तरापर्यंत भोगतो आहोत. आपण गमावलेले ज्ञान, कौशल्य आणि वृत्ती अद्याप या समाजात शिल्लक आहेत. म्हणूनही गरज आहे त्यांना समजून घ्यायची, त्यांच्याकडे असलेले ज्ञान सन्मानपूर्वक आणि सजगपणे बघण्याची आणि त्यातले योग्य व सुसंगत आत्मसात करण्याची.
स्वयंनिर्णय,सहविचार आणि सामुहिक जबाबदारी या त्रिसूत्रीवर शिक्षण-मित्र कार्यक्रमाने भर दिला होता. लोकशाहीची तत्वे प्रत्यक्ष जगण्यातूनच मुलांना शिकण्याची संधी देण्याची आमची धडपड होती. आमच्या असे लक्षात आले याबाबत की याबाबत मुलांपेक्षाही जास्त काम आम्हाला शिक्षकांबरोबरच करावे लागले. याचे कारण आदिवासी समाजामध्ये उपजतच ‘समूहशीलते’ने जगण्याची कला आहे. जीवनाच्या कोणत्याही अंगात हे समूह जीवन प्रतीत होताना दिसते. एका पाड्यावरचे वा वाडीवरचे लोकं ‘एकत्र मिळून जगतात’ असे म्हटले तरी चालेल इतके त्यांचे व्यवहार एकमेकात गुंतलेले आणि एकमेकाशी बांधलेले असतात. मग ते घरातले दैनदिन व्यवहार असो, शेती असो की नृत्य-गायन-अगदी चित्रकलेसारखी कला असो. आदिवासी कलांची प्रेरणा जीवनातल्या विविध अनुभवांचा मिळून आनंद घेणे, आयुष्यातले प्रसंग मिळून साजरे करणे ही आहे. त्यात अधिकाधिक उत्तमतेचा आग्रह किंवा व्यक्तिगत यश, प्रसिद्धी याचा विचार नाही. अशा सामुहिक अभिव्यक्तीत व्यक्ती स्वातंत्र्याला, व्यक्तिगत प्रगतीला मर्यादा पडतात, कलेच्या प्रगतीला अडथळा होतो असाही एक मतप्रवाह आहे. पण व्यक्ती स्वातंत्र्याच्या शोधात लंबकाच्या दुसऱ्या टोकापर्यंत प्रवास करून संवेदनशीलता आणि सामाजिक जबाबदारीचे भान हरवलेल्या आपल्या ‘सभ्य (!)’ समाजाने या ‘समूहशीलतेचे’ धडे त्याची मर्यादा मान्य करूनही घेण्याची वेळ आलेली आहे असे मला वाटते.
मुलांबरोबर काम करतानाच स्वतःचा एक स्वतंत्र दृष्टीकोन घेऊन जगणारी कित्येक माणसं भेटली. वयाची ७० वर्षे ओलांडल्यावरही नुसतं स्वयंपूर्णच नव्हे तर बिनधास्त आणि मस्तीत जगणारी धाकी आजी आणि तिची मैत्रीण. नोकरी बरी म्हणून घराची शेती सोडून आश्रम शाळेत स्वयंपाकी म्हणून नोकरीला आलेला पण मग शाळेत चाललेल्या आमच्या शेतीच्या प्रयोगांनी प्रेरित होऊन परत घरी जाऊन यशस्वी शेती करून पेणच्या बाजारात जम बसवलेला खेमा. एकीकडे आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारत असताना मात्र स्वतःचं आयुष्याचं तत्त्वज्ञान जगणारे – अधिक नफा, अधिक स्पर्धा टाळून आरोग्य, आनंद आणि समाधान मोठं मानून आपल्या परिसराला सुयोग्य अशी शेती करणारे मोचडादादा आणि वसीताई आणि डाह्याभाईदेखील. आपलं वनौषधींच्या ज्ञानाची निसर्गोपाचारांशी सांगड घालून ते पारंपारिक ज्ञान जागरूकपणे पुढे नेणारे नारसिंग महाराज. आदिवासींचे नृत्य व गायन अशा कलाप्रकारांचे आदिवासी संस्कृतीतील महत्व समजणारे आणि ते संग्रहित करून ठेवण्यासाठी आधुनिक कॅमेरा आणि laptop सुद्धा प्रयत्नपूर्वक घेऊन वापरायला शिकणारे नाना पावरा. धान्य आणि भाज्यांची विविध स्थानिक वाण संकलित करून त्यांच्या वैशिष्ट्यांचा व आहार गुणांचा अभ्यास करण्याच्या बायफ संस्थेच्या प्रकल्पातही सध्या ते महत्वाचे योगदान देत आहेत. सातपुड्याच्या कुशीतल्या आदिवासींचे सांस्कृतिक नेतृत्व करणारे आणि पुढच्या पिढीला स्वतःच्या भाषा-संस्कृतीबद्दल अभिमानाचे बाळकडू देणारे वाहरुदादा सोनावणे. आणि नर्मदा आंदोलनातून तयार झालेले पाड्यापाड्यांवरचे स्त्री-पुरुष नेतृत्व. यांच्यापैकी प्रत्येकाने आपापल्या आयुष्याची दिशा स्वतः निश्चित केलेली आहे. शहराकडे वाटचाल, नोकरीतलं स्थैर्य, किमानपक्षी भरपूर पैसा देणारी कॅश क्रॉपवर मदार असणारी शेती हेच प्रगतीचे लक्षण मानण्याच्या काळात या लोकांच्या जगण्याचे निर्णय, त्यांचा दृष्टीकोन यावर मागास हा शिक्का बसणं नवल नाही पण मला तरी त्यात एक शहाणीव दिसते.

या समाजांची मला जाणवलेली स्पंदन, अनेकानेक क्षमता आणि वेगळी जीवनदृष्टी असणारी  ही मुलं-माणसं तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी यापुढे काही लेखन प्रपंच करणार आहे.

5 comments:

  1. Waiting eagerly for next episodes

    ReplyDelete
  2. Seema, thanks for visiting my blog and responding on the post. I'll publish my post in 2nd week of each month for next 11 months.

    ReplyDelete
  3. This is very beautifully written. really waiting for next blog.

    ReplyDelete
  4. Excellent rajashri !! Keep writing !! All the Best always !!!

    ReplyDelete
  5. Thank you unknown and thank you Vivek Sir for your appreciation.

    ReplyDelete