Tuesday, August 15, 2017

त्यांनी अधिकार कमावला


मुलांच्या समित्या आकार घेत गेल्या, आत्मनिर्भर होत गेल्या. त्यांनी मिळवलेले अधिकार व स्वातंत्र्य हे त्यांनी कमावलेले होते. त्यासाठी प्रथम लहान-मोठ्या जबाबदाऱ्या पेलून त्यांनी आमचाच नव्हे तर त्यांच्या शिक्षकांचाही विश्वास कमावलेला होता. ही जबाबदारीची संस्कृती आम्ही जाणीवपूर्वक व प्रयत्नपूर्वक शाळेमधे रूजवली.

शाळेत असताना मुले बागांची, झाडांची काळजी घ्यायचीच – नियमित पाणी घालणे, कुंपण करणे, खत घालणे, कीड लागू नये म्हणून काळजी घेणे वगैरे सर्व निगुतीने करायची. पण शेती उपक्रमाचे सर्वात मोठे नुकसान व्हायचे ते मोठ्या सुट्ट्यांच्या काळात, विशेषतः दिवाळी, होळी आणि मे महिन्याची सुट्टी. या नुकसानीचे समिती सदस्यांना, शिक्षकांना वाईट वाटे कारण त्यांचे श्रम त्यात खर्ची पडलेले असायचे, त्या उपक्रमाविषयी, बागेविषयी आपलेपणा निर्माण झालेला असायचा. पण नुसते भावनिक पातळीवर काही वाटून पुरणार नव्हते तर भावनिक आपलेपणा जबाबदारीच्या जाणिवेत बदलण्याची गरज होती. त्यासाठी काही रचना बसवल्या. 

प्रत्येक सुट्टीला जाण्याआधी शेती उपक्रम राबणाऱ्या समिती सदस्यांनी त्यांच्या उपक्रमाच्या सद्यस्थितीचे एक सर्वेक्षण करायचे असे, जसे परसबागेतील भाजीची काढणी केव्हा अपेक्षित आहे, फुलबाग, फळबाग औषधी वनस्पतींची बाग यांत किती झाडे सद्यस्थितीत जिवंत आहेत, गांडूळखताची काढणी केव्हा होणे अपेक्षित आहे वगैरे. या सर्वेक्षणावर आधारित उपक्रमाचा सद्यस्थिती अहवाल मुलांनी बनवायचा असे. त्यात झालेल्या नोंदीच्या आधारे सुट्टीच्या काळात प्रत्येक उपक्रमांच्या संदर्भातली कोणकोणती कामे करावी लागतील याचा आढावा समिती सदस्यांबरोबर घेतला जाई, ही कामे कोण पूर्ण करेल याचा विचार समिती सदस्यांनी करायचा असे. तसेच सुट्टीच्या काळात उपक्रमाची नुकसानी होऊ नये यासाठी काय करावे याचीही चर्चा मुलांबरोबर होई. यातूनच मग वेगवेगळे उपाय सापडत गेले. 

काही शाळांमधे जवळच्या गावातल्या मुलांनी सुट्टीत आळीपाळीने येऊन गांडूळखत निघेपर्यंत त्याची काळजी घेतली. काही शाळांमधे सुट्टीत घरी जाताना मुले गांडूळे बरोबर सांभाळायला घेऊन गेली. अट ही होती की नेली तेवढी गांडूळे येताना परत आणायची. महिन्या-दोन महिन्यामधे गांडूळांची संख्या वाढायची ती व्याज म्हणून सांभाळणाऱ्या मुलांनी ठेवून घ्यायची. काही समित्या जवळच्या शेतकरीदादांना विनंती करायच्या आमची गांडूळे सांभाळा; दिली तेवढी परत आणायची, जास्तीची त्यांना बक्षीस. 

बागांची काळजी घेण्यासाठी बहुतांश शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विनंती केली जायची. त्यासाठी मुख्याध्यापकांना रितसर पत्रं. खरं तर पूर्वीही तीच पद्धत होती किंबहुना गृहितकच होतं की शिक्षकेतर कर्मचारी याची जबाबदारी सुट्टीच्या काळात घेतील. पण सक्तीचं किंवा ड्युटीचा भाग म्हणून आलेलं काम कोणालाच आवडत नाही. मग हलगर्जीपणाबद्दलचे दोषारोप व्हायचे. मुलांनी रितसर पत्रं लिहून विनंती करायला सुरूवात केल्यावर अनेक शाळांमधलं चित्रं बदललं. कामाठीदादा, शिपाई यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन बागा सांभाळल्या, खताची काळजी घेतली, रोपवाटिका वाढवल्या. काही शाळांमध्ये मुलांनी रूजवलेल्या बियांमध्ये कामाठीदादांनी किंवा शिपाईदादांनी स्वतःच्या आवडीने भर घालून नवी रोपेही तयार केली. 

अनुदानित आश्रमशाळा, उमज इथल्या अधिक्षकांच्या लक्षात आले की कोथिंबिरीचा वाफा बराच शिल्लक आहे आणि पुष्कळ कोथिंबिर त्यातून निघेल. पण दिवाळीच्या सुट्टीला सर्वच घरी गेल्यामुळे कोथिंबिर खायला कोणीच शाळेत शिल्लक नव्हते. त्यांनी मग उमज गावाचे रहिवासी असणाऱ्या स्वयंपाकीणबाईंच्या यजमानांना ती कोथिंबिर १ रूपया जुडी अशा दराने विकली. दादांनी ती गावात, बाजारात विकली. त्यांनाही फायदा झाला आणि कोथिंबिरही वाया गेली नाही. अधिक्षक श्री. वळवी यांनी कोथिंबिरीचे आलेले १२० रूपये जपून ठेवले आणि परसबाग समितीची मुले परत आल्यावर त्यांच्या हवाली केले. त्यातूनच त्यांनी हिवाळी परसबागेसाठी पालक, मेथी यांचे बियाणे आणले. 

मुख्य म्हणजे आपली जबाबदारी म्हणून अंगावर घेतलेलं काम कोणत्याही परिस्थितीत वाऱ्यावर सोडून जायचं नाही ही भावना मुलांमध्ये रूजली. खरं तर शेतकऱ्याच्या मुलांवर हा संस्कार असतोच. गुरा-ढोरांचा बारदाना, वावराची व्यवस्था लावल्याखेरीज शेतकऱ्याचे संपूर्ण कुटुंब बाहेरगावी जाऊ शकत नाही हे मुलांना माहिती असते. पण वैयक्तिक बाबातीत असलेली जबाबदारीची जाणीव सार्वजनिक संदर्भात असतेच असं नाही किंबहुना ती नसतेच असे चित्र आपल्या समाजात दिसते. आम्ही ती जबाबदारीची जाणीव मुलांना शाळेच्या संदर्भात घ्यायची सवय लावली. 

समितीच्या मूलभूत रचना बसल्यानंतर समित्यांचे पदाधिकारी गुप्त मतदान पद्धतीने निवडण्याची सुरूवात केली. यातून दोन गोष्टी साध्य झाल्याः
1)   स्वतःहून जबाबदारी घेऊन येणाऱ्या मुलांची गुंतवणूक आणि जबाबदारीची भावना या दोन्ही गोष्टी वाढल्या.
2)   यातून मुलांना लोकशाहीची मूल्ये शिकता आली.
ग्रामपंचायत किंवा सहकारी सोसायट्या, या वास्तव जगातल्या निवडणूकांचे प्रतिबिंब या निवडणूकांवरही दिसले. अवास्तव आश्वासने देणे, बोगस मतदान, चिठ्ठ्या पळवण्याचा प्रयत्न हे सगळे प्रकार या निवडणूकींदरम्यान काही शाळांमधे दिसले. त्याबद्दल चर्चाही झाली. समाजात सध्या अस्तित्त्वात असलेल्या लोकशाहीचा अनुभव मुलांना देणे हा उद्देश नक्कीच या खटाटोपामागे नव्हता. त्यामुळे पुढच्या वर्षी निवडणूका घेतल्या तेव्हा ठरवलेली उद्दीष्टे साध्य व्हावीत यासाठी आणखी नियोजनबद्ध रितीने तयारी करून त्या घेतल्या. 

§  सर्वप्रथम समितीच्या सदस्यांशी अध्यक्ष व सचिव पदासाठीचा उमेदवार कसा असावा याबद्दल चर्चा झाली
बाहेरच्या राजकारणाचे प्रतिबिंब मुलांवर कसे उमटते याचा आणखी एक नमुना यावेळी पहायला मिळाला.
एका शाळेमधे आधीच्याच पदाधिकाऱ्यांनी पुन्हा निवडणूकीला उभे राहण्याची इच्छा व्यक्त केली पण त्या समितीसाठी इतर काही मुलेही पदाधिकारी होऊ इच्छित होती. नव्या मुलांनाही संधी मिळायला पाहिजे अशी आम्ही आधीच्या पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण ते ऐकायला तयार नव्हते. बराच वेळ सामोपचाराने मार्ग निघत नाही असे बघितल्यावर त्या शाळेत काम करणाऱ्या बायफ-मित्रच्या ताईने नव्या सभासदाची उमेदवाराची veto वापरून जाहीर केली. त्याबरोबर आधीच्या पदाधिकाऱ्यांनी समितीतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला आणि ते निघून गेले. आता ही परिस्थिती कशी हाताळावी या विचाराने आम्ही गोंधळून गेलो. पण सतत पदाचा आग्रह धरणे ही चांगली वृत्ती नाही आणि असे सदस्य आपल्या समितीत नसले तरी चालतील अशी भूमिका घेऊन आम्ही निवडणूकीचे कामकाज पुढे चालविले. परंतु नंतर विचार करताना असे वाटले की ही भूमिका समितीच्या मुलांसमोर मांडून निर्णय त्यांच्यावर सोपवायला हवा होता.
 §  उभ्या राहिलेल्या उमेदवारांनी जाहिरनाम्यात लिहिलेल्या गोष्टी कशा पूर्ण करायच्या याचा विचार केला आहे का याची चाचपणी केली. उदा. आम्ही परसबागेसाठी पाणी आणू असे आश्वासन अनेक उमेदवारांनी दिले होते, तेव्हा पाणी आणणे ही गोष्ट त्यांच्या आवाक्यातली आहे का, कोठून पाणी आणणार, त्यांनी मांडलेले पर्याय व्यावहारिक आहेत का अशा मुद्द्यांची त्यांच्याबरोबर चर्चा झाली. उमेदवारांनी अप्राणिक आणि अवास्तव आश्वासने देणारे जाहिरनामे लिहू नयेत, स्वतःच्या आवाक्यातल्याच गोष्टी कबूल कराव्यात हे त्यांच्या लक्षात आणून दिले.
§  प्रचारादरम्यान उमेदवारांनी सादर केलेल्या जाहिरनाम्यांना प्रश्न विचारण्याची मुभा मतदारांना आहे याची त्यांना जाणीव करून दिली.
§  कोणते निकष लावून योग्य त्या उमेदवाराची निवड करायची याचीही चर्चा मतदारांबरोबर झाली.
§  मतदानाची प्रक्रीया प्रामाणिकपणे होईल यासाठी उमेदवार आणि मतदार या दोघांबरोबरही बोलणे झाले आणि त्याची काळजीही घेतली गेली.
§  सर्वात शेवटी निकाल जाहीर झाल्यावर निवडून आलेल्या उमेदवारांनी मतदारांचे जाहीर आभार मानण्याचा कार्यक्रम झाला.
§  पद म्हणजे एक जबाबदारी आहे आणि निवडून आलेले पदाधिकारी हे सर्व मतदारांना उत्तरदायी आहेत. मतदार केव्हाही त्यांना प्रश्न विचारू शकतात ही जाणीव त्यांना करून दिली. 

ही जबाबदारीची जाणीव समित्यांच्या कामातून प्रतिबिंबित होत रहिली.
या सर्व आखणीनंतरही एका शाळेमधे बोगस मतदान होण्याची शक्यता लक्षात आल्यावर बोगस मते ओळखता येतील अशी व्यवस्था विचारपूर्वक केली. विशिष्ट आकाराच्या चिठ्ठ्या फाडून त्या अगदी आयत्या वेळी मतदारांच्या हातात दिल्या. त्यानुसार बोगस मतदान शोधले आणि ती मते संबंधित उमेदवाराच्या एकूण मतांतून वगळली. यामुळे निकाल बदलले. सर्वाधिक मते मिळालेले काही उमेदवार बोगस मते वगळल्यावर पडले. हे सर्व सविस्तरपणे सर्व उमेदवार आणि मतदार यांच्या सभेत जाहिरपणे सांगितले. पुढच्या निवडणूकीत बोगस मतदान करण्याआधी ही मुले विचार करतील असे वाटते.  

समित्यांचा निवडणूकीमुळे विद्यार्थी समित्या सर्व शाळेत गाजल्या, संपूर्ण शाळेत त्यांना ओळख मिळाली. खेरीज आणखी काही गोष्टी साध्य झाल्याः
इ. ५वी ते इ. १०वीतील सर्व मुलांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यातून उपक्रम सगळ्या शाळेचे आहेत आणि विद्यार्थी समिती विश्वस्त म्हणून त्यांची काळजी पाहत आहे असा संदेश सर्वांपर्यंत पोहोचला. यामुळेच इतर  मुलांच्या मनात उपक्रमाविषयी आपलेपणाची भावना निर्माण व्हायला मदत झाली. 

विद्यार्थी समित्यांनाही हक्काने मुलांना कामात जोडून घेण्यासाठी आत्मविश्वास वाटायला लागला. मोरंबा आश्रमशाळेच्या परसबाग समितीचा अध्यक्ष प्रताप याच्या निवेदनात तो व्यक्त झाला आहेः
फुलबाग समितीने नर्सरी केली आहे. ९वी व ८वीचे सगळे एकत्र बसून ते काम केलेले आहे. फुलबाग समितीने सांगितले की वर्गातील सर्व मुले येतील तर आम्हाला फार आनंद होईल, म्हणून ९वी व ८वीचे सगळे वर्गातील मुलांनी एकत्र बसून पिशव्या भरून घेतल्या, बियाणे टाकले. आता पाणी टाकायचे काम पण सर्व मुले दररोज पाळी लावून करतात.
याच शाळेच्या आरोग्य समितीच्या मुलांना जाणवले की शाळेतील लहान वयाची मुले स्वतःचे कपडे धुवू शकत नाहीत तेव्हा त्यांचे कपडे धुण्याची जबाबदारी मोठ्या मुलांनी घ्यावी. त्यांनी इ. ७वी ते इ. १०वी पर्यंतच्या सर्व मुलांची मिटींग बोलावली आणि आवाहन केले की प्रत्येकाने १ली ते ६वीतील ठराविक मुला-मुलींची जबाबदारी घेऊन स्वतःबरोबर त्यांचेही कपडे दर रविवारी धुवावे. मुलांनीही समितीच्या निर्णयाला प्रतिसाद देऊन ती जबाबदारी स्वीकारली. 

४०० ते ६०० मुला-मुलींच्या वसतीगृहामधे एकच अधिक्षक आणि एक अधिक्षिका असताना (वास्तवात मुलींसाठीच्या अधिक्षिकांचे पद ५०% हून अधिक शाळांमधे रिक्तच असते) मोठ्या मुलांनी लहान मुलांच्या पालकत्वाची जबाबदारी घेण्याची तयारी दाखवणे ही फार मोठी गोष्ट आहे. स्वयंनिर्णयाच्या अधिकाराला जबाबदारीच्या जाणीवेची आणि संवेदनशीलतेची जोड मिळाली तर मुलांची बुद्धिमत्ता आणि शक्ती ही सामुहिक भल्यासाठी कशी कारणी लागू शकते याचे अनेक अनुभव शाळांनी घेतले आणि या टप्प्याला अनेक शाळांचा, शिक्षकांचा समित्यांना असलेला छुपा विरोधही संपुष्टात आला. आता शिक्षक आणि अधिक्षकच समित्यांना पाठिंबा देऊ लागले. अर्थात काही अपवाद राहिलेच. 

जिथे असा अपवादात्मक विरोध राहिला तिथेही मुलांनी चिकाटीने आणि लोकशाही मार्गानेच आपले प्रयत्न चालू ठेवले. परसबागेसाठी जागेची मागणी करणाऱ्या एका समितीच्या नोंदीत त्याची झलक दिसते आहेः
सकाळी १० वाजेल अर्ज वसावे सरांना द्यायला गेलो. त्यांनी ते वाचले. मग त्यांनी सांगले की थांबा, कायमवाले शिक्षकांना येऊ द्या मग करू. अजून नंतर सरांनी सांगले की तुमच्या ताटातले जेवण बकऱ्या खाऊन जातात मग ते भाजीपाला राहू देतील काय?’ मग मी सांगले की आमच्याकडून जेवढं होईल तेवढं आम्ही करू सर.
नंतर अजून मी विचारायला गेलो की आम्ही फाटे (कुंपणासाठी) तोडायला जाऊ का? तर सरांनी सांगले की थांबा ते शाळेत अधिकारी येणार आहेत ते येऊन जाऊ द्या मग करू.
शाळेचे मुख्याध्यापक काही ना काही कारण काढून विरोध करत असले तरी मुलांनी चिकाटी सोडली नाही आणि शांततामय प्रयत्नही. अखेर त्यांनी परसबाग करून दाखवलीच. 

विचारपूर्वक, जबाबदारीने आणि सुनियोजित पद्धतीने काम करण्यातूनच मुलांमधे आत्मविश्वासाची, कर्तेपणाची भावना निर्माण झाली. स्वतःचे नावही सांगायला भिणारी, लाजणारी ही मुले शेवटच्या टप्प्यात स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ लागली, स्वतंत्रपणे उपक्रम चालवायला लागली, आमच्या बरोबरीने बैठकीत बसून आपण केलेल्या कामाचे ओघवते सादरीकरण करायला लागली. इतर विद्यार्थ्यांसाठी ती प्रशिक्षक बनली. स्वतः शिकलेल्या अनेक गोष्टी सवंगडी शिक्षक बनून शिकवायला लागली. 

फक्त सह-विद्यार्थीच नव्हे तर पालक, गावकरी यांच्यासाठीही ते विकासाचे दूत बनले. स्वतःच्या घरी, गावात त्यांनी प्रात्यक्षिके दिली, सर्वेक्षणे केली, मेळावे घेतले. सातपुड्यातलेया दुर्गम गावांसाठी ही मुलांनी जणू नव्या ज्ञानाच्या दालनाची खिडकी किलकिली केली. त्याविषयी पुढील लेखात...

(मिळून साऱ्याजणी मे २०१७ च्या अंकात पूर्वप्रकाशित)

4 comments:

  1. A wonderful, replicable and very practical example to implant democratic values!
    Sujala

    ReplyDelete
  2. Tremendous impact. This is the social change process and with collective planning, decision, implementation and wisdom. One of the great example or benchmark to stimulate the democratic process and values.

    Great,,

    Nitin Kambale

    ReplyDelete
  3. चांगले दस्तऐवजीकरण केले आहे। मौलिक अनुभव आणि प्रयोग आहे। मूल्यशिक्षण खरे तर असे कृतिशील अनुभवातून शिकण्याचे असायला हवे। आनंद वाटला।

    ReplyDelete
  4. सुजलाताई, नितीन व संग्राम, तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
    आदिवासी शाळांप्रमाणेच ग्रामीण आणि शहरी शाळांमधेही हे काम व्हायला हवं असं मला मनापासून वाटतंय्.

    ReplyDelete